सोलापूर झेडपीच्या 'या' शिक्षकांसाठी तालुकास्तरावर
कार्यशाळा; उपस्थिती बंधनकारक असणार
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेतील महिला शिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी व गुणवत्ता वाढीसाठी तालुकास्तरावर कार्यशाळा घेतल्या जाणार आहे.
दि.३० एप्रिलपर्यंत या कार्यशाळा त्या-त्या तालुक्यात घेण्याची सूचना त्यांनी केली आहे. या कार्यशाळेचा लाभ जिल्ह्यातील ३ हजार १२८ शिक्षकांना होणार आहे.
शिक्षिकांचा व्यक्तिमत्त्व विकास करणे, ग्रामीण भागात कार्य करण्यासाठी त्यांचा आत्मविश्वास वाढविणे,
महिलांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन करून आरोग्यक्षम बनविणे, सक्षमीकरणासाठी महिलांचे कायदे त्यांना समजावून सांगणे, गुणवत्ता वाढीसाठी कार्यक्षम बनवणे,
मुलांच्या शिक्षणासाठी नव्या संकल्पना / शासन निर्णय व धोरण समजावून सांगणे, दससूत्रीच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करणे या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित केली जात आहे.
या कार्यशाळा तालुका स्तरावर आयोजित केल्या जाणार असून कार्यशाळेसाठी १०० महिला शिक्षकांची उपस्थिती बंधनकारक आहे. कार्यशाळेला उपस्थित राहणाऱ्या महिलांची हिमोग्लोबिन तपासणी केली जाणार आहे.
कार्यशाळा यशस्वी करण्याची जबाबदारी सीईओ स्वामी यांनी त्या त्या तालुक्याचे गट विकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
0 Comments