google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मंगळवेढ्याच्या महेंद्र गायकवाड याने पटकाविली 35 लाखांची सोन्याची गदा; छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचा ठरला विजेता

Breaking News

मंगळवेढ्याच्या महेंद्र गायकवाड याने पटकाविली 35 लाखांची सोन्याची गदा; छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचा ठरला विजेता

मंगळवेढ्याच्या महेंद्र गायकवाड याने पटकाविली 35 लाखांची सोन्याची गदा; छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचा ठरला विजेता 

तब्बल 35 लाख रुपये किमतीची व पिवळ्या धम्मक पत्र्याने मढवलेली अर्धा किलोची सोन्याची गदा रविवारी सायंकाळी सोलापूरचा पहिलवान उपमहाराष्ट्र केसरी पदक विजेता महेंद्र गायकवाडने पटकावली.

पुण्याच्या शिवराज राक्षेविरुद्ध त्याची माती आखाड्यातील बेमुदत व निकाली कुस्ती 10 मिनिटेच रंगली. दोघांनीही ताकद व कौशल्य पणाला लावत एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न केला.

पण महेंद्रने एकटाकी मारत शिवराजला उलटा करून खाली आपटला आणि त्याच वेळी त्याचा डाव्या पायाचा गुडघा सरकला. परिणामी, जखमी झाल्याने त्याने कुस्ती खेळण्यास नकार दिला आणि छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेतील सोन्याच्या गदेचा मानकरी महेंद्र गायकवाड ठरला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला गदा दिल्यावर नगरकर कुस्ती शौकिनांनी टाळ्या-शिट्ट्यांचा गजर केला. त्यानंतर विजेत्या महेंद्रला त्याच्या सहकाऱ्यांनी गदेसह खांद्यावर उचलून घेत आखाड्याला फेरी मारली.

त्यावेळी गायकवाड याने दोन्ही हात जोडत कुस्तीप्रेमींना अभिवादन केले. मागील तीन दिवसांपासून येथील वाडियापार्क क्रीडा संकुलात छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धा रंगली होती.

गादी गटाच्या अंतिम सामन्यात शिवराज राक्षेने पुण्याच्याच माऊली कोकाटेवर 12 विरुद्ध 2 गुणांनी विजय मिळवून सुवर्ण गदेच्या अंतिम कुस्ती लढतीत प्रवेश केला तर दुसरीकडे माती आखाड्यात महेंद्र गायकवाडने वाशिमच्या सिकंदर शेखला 4 विरुद्ध 3 गुणांनी मात दिली.

मध्यंतरात 3 विरुद्ध शून्य असे मागे पडलेल्या महेंद्रने नंतर सलग चार गुण घेत सिकंदरला हरवले व नंतर सुवर्ण गदेच्या अंतिम लढतीतही विजेतेपद पटकावले. त्याच्या विजेतेपदाचा जल्लोष नगरकर कुस्ती प्रेमींनी जोरदार केला.

फटाक्‍यांच्या आतषबाजीत त्याला सुवर्ण गदा दिली गेली. प्रसिद्ध कुस्तीपटू काका पवार यांचे शिष्य असलेल्या शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड यांची सुवर्ण गदेसाठीची लढत रोमहर्षक झाली.

ही निकाली कुस्ती असल्याचे जाहीर करून तिला वेळेचे बंधन नसल्याचेही स्पष्ट केले गेल्याने चितपट कुस्ती पाहण्यास मिळेल, अशी आशा कुस्तीप्रेमींना होती.

दोघेही प्रत्येकी सव्वाशे किलो वजनाचे असल्याने त्यांच्यातील खडाखडीही रंगतदार झाली. दोघेही महाराष्ट्र केसरी स्पर्धेची अंतिम लढत खेळलेले असल्याने अनुभवाचा कस त्यांनी लावला होता.

सुरुवातीला महेंद्रने दुहेरी पट काढण्याचा प्रयत्न केला. पण शिवराज त्यातून निसटला. त्यानंतर महेंद्रने घिस्सा डाव टाकला. पण तोही यशस्वी झाला नाही. त्यानंतर शिवराजने एकेरी पट काढून महेंद्रचा कब्जा घेतला.

पण महेंद्रने एकटाकी मारत शिवराजला उचलून खाली आपटले व त्याचवेळी शिवराजचा डावा गुडघा सरकल्याने तो कळवळला व त्याने पाय कसाबसा सरळ केला. त्याची अवस्था पाहून महेंद्रने त्याला सोडले. वैद्यकीय पथकही लगेच मैदानात आले.

पण शिवराजचा डावा पाय गुडघ्यातून वाकू शकत नसल्याने त्याने कुस्ती खेळण्यास नकार दिला व अखेर महेंद्र गायकवाडला विजेते घोषित करण्यात आले.

Post a Comment

0 Comments