google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला रस्ता दुरूस्तीची बोगस बिले काढून भ्रष्टाचार करणार्‍या कार्यकारी अभियंत्यासह उपअभियंता यांची सखोल चौकशी व्हावी

Breaking News

सांगोला रस्ता दुरूस्तीची बोगस बिले काढून भ्रष्टाचार करणार्‍या कार्यकारी अभियंत्यासह उपअभियंता यांची सखोल चौकशी व्हावी

सांगोला रस्ता दुरूस्तीची बोगस बिले काढून भ्रष्टाचार

करणार्‍या कार्यकारी अभियंत्यासह उपअभियंता यांची सखोल चौकशी व्हावी

सांगोला/प्रतिनिधी –बहुचर्चित महूद – सांगोला रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ११ कोटीच्या निधीतून काम पूर्ण न करताच पुन्हा नव्याने त्याच रस्त्यावरील प्रत्येकी ३ लाखांच्या तीन -चार निविदा काढून खड्डेही अर्धवट बुजवून   घेवून रस्त्याची दुरुस्ती न करता बोगस बीले काढून लाखो करोडोचा भ्रष्टाचार केला .

सदर प्रकरणी संबंधित राष्ट्रीय महामार्ग सोलापूर कार्यकारी अभियंत्यांसह उपअभियंता यांची खातेनिहाय सखोल चौकशी करावी या मागणीसाठी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष हरिभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली काल शनिवारी सकाळी११ वाजता महूद – सांगोला रोडवरील चिंचोली तलावाजवळ रस्ता रोको आंदोलन केले. 

आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी आंदोलन कर्त्याच्या वतीने निवासी नायब तहसीलदार किशोर बडवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंतकुमार काटकर यांना  निवेदन देवून रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

 यावेळी आरपीआयचे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते, जिल्हा उपाध्यक्ष नवा सरतापे , शेतकरी संघटनेचे गोरख घाडगे सामाजिक कार्यकर्ते प्रताप घाडगे, दिगंबर कारंडे, चिंचोलीचे सरपंच दत्तात्रय बेहरे,महूदचे सामाजिक कार्यकर्ते बापू येडगे ,अनिल बेहरे ,बाबासाहेब ऐवळे, लक्ष्मण गडदे पत्रकार दीपक धोकटे यांच्यासह वाहन चालक वाहक मालक सहभागी झाले होते.  यावेळी पोलीस नाईक आप्पासाहेब पवार वाहतूक शाखेच्या पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.

 राष्ट्रीय महामार्ग उपविभाग शेटफळ अंतर्गत जत ते वेळापूर ९० किमी लांबीच्या रोडवर गेल्या चार वर्षात लाखो, कोट्यावधी रुपये खर्चूनही खड्डे मुक्त न झालेल्या सांगोला ते महूद १८ कि.मी लांबीचा रोड वाहतुकीसाठी दिवसेंदिवस अत्यंत धोकादायक झाला आहे. 

राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून वेळापूर ते सांगोला व पुढे बारामती पाटस पर्यंत नवीन रस्ता काँक्रिटीकरण कामासाठी सुमारे २५५ कोटी रुपये मंजूर केले आहेत परंतु या रोडचे प्रत्यक्षात काम सुरू होण्यास अजून अवधी लागणार आहे

 त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग उपविभागाकडून प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत खड्डेमय झालेल्या महूद- सांगोला रोडवरील ठेकेदाराकडून खड्डे व चा-या खडी व कार्पेट टाकून न बुजवून घेता  खड्ड्यात चक्क  माती, मुरूम टाकून बुजविले जात आहेत. त्यामुळे रस्त्यावरून वाहने गेल्यानंतर पाठीमागे उडणाऱ्या धुरळ्याचा त्रास दुचाकीस्वार, प्रवासी नागरिकांना सोसावा लागत आहे.

त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभाग कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ लक्ष्य घालून नवीन काँक्रीटकरण रोडचे काम सुरू होईपर्यंत रोडचे डांबरीकरण करून घेवून रोड खड्डे मुक्त करावा अन्यथा रस्ता रोको आंदोलन करावे लागेल असा इशारा  सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष हरिभाऊ पाटील यांनी दिला होता.

चौकट – सांगोला- महूद रस्ता रोको आंदोलनाची दखल घेवून राष्ट्रीय महामार्ग विभाग सोलापूर कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांना लेखी पत्र दिले आहे. येत्या सोमवारी सांगोला तहसील कार्यालयात आंदोलनकर्ते हरिभाऊ पाटील खंडू सातपुते व महामार्ग अधिकारी याच्यासमवेत संयुक्तपणे मीटिंग ठेवल्याचे निवासी नायब तहसीलदार किशोर बडवे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments