शिवसेनेला आता नवे टेन्शन
ठाकरे गटाला त्यांचा नवीन पक्षप्रमुख निवडायचा आहे. त्यासाठी संघटनात्मक निवडणूक घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून मुदत २३ जानेवारी रोजी संपत आहे. ठाकरे गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या काही सदस्यांची निवड करायची आहे. संघटनात्मक निवडणुका घेऊन ही निवड केली जाणार आहे. उद्धव यांची मुदत संपण्याआधी संघटनात्मक निवडणुकीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
आयोगाने संघटनात्मक निवडणुकीसाठी परवानगी दिली नाही तर उद्धव यांना पुढील आदेश येईपर्यंत पक्षप्रमुख राहू द्यावे, अशीही मागणी आयोगाकडे करण्यात आली आहे, असेही देसाई यांनी सांगितले. ठाकरे व शिंदे गटाची निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरु आहे. याची माहिती देसाई यांनी दिली.
ते म्हणाले, कोणत्याही पक्षाची निवडणूक लढवायची असेल तर पक्षाचा सदस्य असणे आवश्यक आहे. पक्षाचा पदाधिकारी किंवा सदस्य असेल तरच निवडणूक लढवता येते. तसाच निवडणूक आयोगाचा नियम आहे. त्यामुळे कोणाकडे किती सदस्य आहेत याची चौकशी व्हावी. केवळ त्यांचेच नाही तर आमचेही सदस्य मोजा.
प्रत्येकाला बोलावून त्याला विचारा तुम्ही सदस्य आहात की नाही. ही प्रक्रिया केली तर कोणाकडे सदस्य संख्याबळ अधिक आहे हे सिद्ध होईल. शिंदे गटाने या प्रक्रियेला विरोध केला आहे. देशभरात कार्यकर्ते विखुरलेले असतात. त्यामुळे कार्यकर्ते कसे मोजणार, असा युक्तिावाद शिंदे गटाने आयोगासमोर केला.


0 Comments