तोतया अधिकाऱ्यांकडून झेडपी शाळा तपासणी!
शिक्षणाधिकाऱ्यांचे मुख्याध्यापकांना नवे आदेश
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या शाळांची तपासणी करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याला ओळखपत्र बंधनकारक आहे. मुख्याध्यापकांनीही त्यांच्याकडील ओळखपत्र पाहिल्याशिवाय कोणालाही शाळेत तथा वर्गात प्रवेश देऊ नये, असे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी दिले आहेत.
सहायक शिक्षणाधिकारी असल्याचे खोटे सांगून तोतया व्यक्तींनी दक्षिण सोलापूर व टेंभुर्णीतील जिल्हा परिषद शाळांची तपासणी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हे निर्देश देण्यात आले आहेत.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जिल्हा परिषद शाळांची तपासणी करताना एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. फिरदोस गफ्फार शेख व शाहिद उल्लू खान हे दोघे दक्षिण सोलापुरातील शाळांची तपासणी करीत होते.
आपण सहायक शिक्षणाधिकारी असल्याचे सांगून बनावट ओळखपत्र दाखवून हा प्रकार सुरू होता. वळसंग पोलिसांना त्यासंबंधीची माहिती मिळताच, त्यांनी दोन्ही संशयितांकडे चौकशी केली. नांदेड व सोलापूर जिल्हा परिषदेत ती महिला कार्यरत नसल्याचे उघड झाले.
आता साक्षीदारांची तपासणी पोलिसांकडून सुरू आहे. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचेही जबाब घेतले जाणार आहेत. त्यानंतर पोलिस पुढील कारवाई करतील, असे सहायक पोलिस निरीक्षक अतुल भोसले यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच टेंभुर्णीत तसाच प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शिक्षण विभाग अलर्ट झाला असून, त्यांनी मुख्याध्यापकांना खबरदारीच्या सूचना केल्या आहेत.
मुख्याध्यापकांनी पाहावे ओळखपत्र
अधिकारी असल्याचे भासवून बेकायदेशीरपणे शाळांची तपासणी केली जात असल्याचे प्रकार घडत असल्याने आता मुख्याध्यापकांना सक्त सूचना केल्या आहेत. शाळा तपासणीसाठी कोणीही आल्यास, मुख्याध्यापकांनी सर्वप्रथम त्यांच्याकडील ओळखपत्र पाहून वरिष्ठांना त्याची माहिती द्यावी, असे सर्वांना सांगितले आहे.
- संजय जावीर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर
मुख्याध्यापकांसाठी अधिकारी अनोळखी कसे?
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी अचानकपणे शाळा तपासणी करतात. विद्यार्थ्यांचे अध्यापन कसे सुरू आहे,
शिक्षक शाळेच्या वेळेत काय करतात, कोण परस्पर रजेवर किंवा दुपारूनच घरी गेला आहे का, पोषण आहार चांगला आहे का, वेळेत दिला जातो का, अशा मुद्द्यांची पडताळणी अधिकारी वेळोवेळी करत असतात. त्यामुळे शिक्षक, मुख्याध्यापकांना आपल्या विभागाचे जिल्ह्यातील अधिकारी ओळखीचेच असतात.
तरीदेखील काही शाळांमध्ये तोतया अधिकारी जाऊन शाळा तपासणीचे धाडस करतोच कसे? आपल्या विभागात त्या नावाचा किंवा तसा दिसणारा कोणी अधिकारी नाही, याची माहिती मुख्याध्यापकांना नसते का, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.


0 Comments