google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात अत्यंत भीषण अपघातात पती पत्नी ठार !

Breaking News

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात अत्यंत भीषण अपघातात पती पत्नी ठार !

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात अत्यंत भीषण अपघातात पती पत्नी ठार ! 

पंढरपूर तालुक्यात अत्यंत भयानक अपघात झाला असून या अपघातात भाविक पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर दुचाकीचे अक्षरश: दोन तुकडे होऊन पडले आहेत.

रस्ते रुंद आणि सिमेंटचे तयार झाल्यापासून सातत्याने मोठमोठे अपघात होत असून अनेकांचे बळी जात आहेत. 

अमर्याद वेग माणसाचे बळी घेत सुसाट सुटला असून आज गुरुवारी पुन्हा एकदा पंढरपूर - कराड मार्गावर अत्यंत भयावह असा अपघात घडला आहे. पंढरपूरकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावर पंढरपूर तालुक्यातील उपरी गावाजवळ आज गुरुवारी हा भीषण अपघात झाला. 

भरधाव वेगातील एक कार आणि दुचाकी यांच्यात हा अपघात झाला असून कार उलटी होऊन पडली आहे तर दुचाकीचे अक्षरश: दोन तुकडे झाले आहेत.  साताऱ्याकडून पंढरपूरच्या दिशेने दुचाकी (एम एच ११ डी एफ ०७६९) येत होती तर फोर्ड कार (एम एच १३ बी एन) पंढरपूरकडून साताऱ्याच्या दिशेने निघाली होती. 

दुचाकी आणि कार यांच्यात पंढरपूर तालुक्यातील उपरी गावाजवळ जोरदार अपघात झाला आणि या अपघातात दुचाकीचे दोन तुकडे होऊन पडले तर कार उलटी होऊन पडली. या अपघातात सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील शेनवाडी येथील प्रकाश दादा भुजबळ आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मी प्रकाश भुजबळ यांचा मृत्यू झाला आहे. 

सदर भाविक पती पत्नी हे श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूरला दुचाकीवरून निघाले होते परंतु पंढरपूर तालुक्यात आल्यावर त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि विठ्ठल दर्शनाची इच्छा अपुरी राहिली. भुजबळ पती पत्नी यांना अपघातानंतर पंढरपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

सदर अपघात प्रकरणी उपरी येथील सीताराम वसंत जाधव यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  

 कारने जोराची धडक दिल्यानंतर दुचाकीवर मागे बसलेली महिला उडून शेतात जाऊन पडली तर कारने दुचाकी चालकास (प्रकाश भुजबळ) दुचाकीसह फरफटत नेले आणि नंतर ही कार शेतात जाऊन पलटी झाली. 

कारचालक संजय साहेबराव नागणे हा देखील जखमी होऊन गाडीतच पडला होता. सदर कारचालक हा पंढरपूर तालुक्यातील उपरी येथील असून गावातील नागरिकांनी त्याला दरवाजा उघडून गाडीबाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. 

या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर कार चालक स्वत: जखमी झाला असून दोन्ही वाहनांचे सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. कारचालक नागणे याच्या चुकीमुळे सदर अपघात झाला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले असून कारचालक नागणे याच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची परिस्थिती अत्यंत भीषण होती तर भरधाव वेगामुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शी सागंत आहेत.

Post a Comment

0 Comments