सोलापूर पोलिसांना पाहताच मोटारसायकलस्वार गाडी सोडून फरार ; स्विफ्ट कारमधून होत होती गोवानिर्मित दारुची वाहतूक ; पुढे काय झाले.....
सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूरच्या पथकाने 5 डिसेंबर रोजी मोहोळ तालुक्यात खंडाळी गावाच्या हद्दीत एका मारुती स्विफ्ट कारमधून गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याचा साठा जप्त केला तसेच 6 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास सोलापूरच्या पथकाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षीहिप्परगा ताडंयावरील हातभट्ट्यांवर धाडी टाकून 3 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला.
सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभाग पंढरपूरचे प्रभारी दुय्यम निरिक्षक अंकुश आवताडे यांना गोवा दारूच्या वाहतुकीबाबत मिळालेल्या खात्रीलायक
बातमी नुसार त्यांनी 5 डिसेंबर मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील खंडाळी ते खंडाळी पाटी रोडवर सापळा रचला असता त्यांना एक विना नंबर प्लेट बजाज प्लॅटिना मोटरसायकलीवरुन एक इसम संशयितरीत्या येतांना दिसला, त्याला थांबण्याचा इशारा केला असता तो मोटरसायकल जागीच सोडून फरार झाला.
यावरुन संशय बळावल्याने पाठीमागून येणा-या एक मारुती स्विफ्ट कार क्रमांक MH12 HV 5790 या वाहनास थांबवून पंचांसमक्ष वाहनाची झडती घेतली असता त्यात देशी - विदेशी दारुचा साठा दिसून आला.
वाहनचालक बालाजी बबन खडके, रा. टेंभुर्णी ता. माढा या इसमास जागीच ताब्यात घेऊन त्याचेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 च्या कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या गुन्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारमधून गोवा राज्य निर्मित एड्रियल व्हिस्कीच्या 750 मिली क्षमतेच्या 180 बाटल्या, रॊयल स्टॅग व्हिस्कीच्या विदेशी मद्याच्या 180 मिली क्षमतेच्या 50 बाटल्या, इंपेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या विदेशी मद्याच्या 180 मिली क्षमतेच्या 48 बाटल्या, देशी दारुच्या 180 मिली क्षमतेच्या 144 बाटल्या,
बनावट बुचे जप्त केले असून जप्त केलेल्या दारूची किंमत एक लाख 34 हजार इतकी असून दोन्ही वाहनासह एकूण सहा लाख दोन हजार 780 किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यातील दुसरा आरोपी सचिन बन्सोडे हा फरार असून त्याचा शोध सुरु आहे.
तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अ विभाग, ब विभाग व भरारी पथकाने 6 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षीहिप्परगा तांडा येथील सेवा तांड्यावर छापा टाकून नवनाथ खेमा राठोड याच्या घरातून 8 रबरी ट्यूबमध्ये साठवून ठेवलेली 640 लिटर व द्वारकाबाई कोंडीबा राठोड,
रा. सेवा तांडा हीच्या घरातून 22 रबरी ट्यूबमधून 2200 लिटर हातभट्टी दारु जप्त केली. तसेच पथकाने गणपत तांडा परिसरातील हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकून विजय मानसिंग चव्हाण व संजय थावरु पवार यांच्या ताब्यातून हातभट्टी दारु तयार करण्याकरीता लागणारे 36 प्लास्टीक बॅरेल मध्ये साठवणूक केलेले
गुळमिश्रित रसायन जप्त करुन जागीच नष्ट केले. तांड्यावरील संपूर्ण कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दोन हजार आठशे चाळीस लिटर हातभट्टी दारु व सात हजार दोनशे लिटर रसायन असा एकूण 3 लाख सात हजार सहाशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उप आयुक्त अनिल चासकर, अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक सूरज कुसळे, संभाजी फडतरे, सदानंद मस्करे, दुय्यम निरिक्षक अंकुश आवताडे, शंकर पाटील, उषाकिरण मिसाळ,
सुनिल पाटिल, गणेश उंडे, सहायक दुय्यम निरिक्षक जीवन मुंढे, सिद्धराम बिराजदार, गजानन होळकर, जवान गणेश रोडे, विकास वडमिले, मलंग तांबोळी, भाग्यश्री शेरखाने, प्रियंका कुटे, अनिल पांढरे, अण्णासाहेब कर्चे, प्रशांत इंगोले व वाहनचालक रशीद शेख, रामचंद्र मदने व मारुती जडगे यांच्या पथकाने पार पाडली.
0 Comments