google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जन्मदात्याची क्रूरता! पळून गेल्याच्या रागातून लावला मुलीस गळफास अन् मृतदेहही जाळला

Breaking News

जन्मदात्याची क्रूरता! पळून गेल्याच्या रागातून लावला मुलीस गळफास अन् मृतदेहही जाळला

 जन्मदात्याची क्रूरता! पळून गेल्याच्या रागातून लावला मुलीस गळफास अन् मृतदेहही जाळला

जन्मदात्या पित्याने भावासोबत मिळून अल्पवयीन मुलीचा खून करून तिचा मृतदेहही जाळला.ही धक्कादायक घटना पीरपिंपळगाव (ता. जालना) येथे घडली असून, या प्रकरणात मयत मुलीच्या वडिलांसह काकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मुलगी नात्यातील मुलासोबत निघून गेल्याने आरोपींनी हे कृत्य केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

सूर्यकला संतोष सरोदे (१७) असे मृत मुलीचे नाव आहे. पोलिसांनी संशयित संतोष भाऊराव सरोदे, नामदेव भाऊराव सरोदे (दोघेही रा. पीरपिंपळगाव) यांना ताब्यात घेतले. सूर्यकला नात्यातील एका मुलासोबत निघून गेली होती. नातेवाईकांनी 'तुमचे लग्न लावून देतो, तुम्ही घराकडे या,' असे सांगून त्यांना बोलावून घेतले. 

दोन्ही परिवार मंगळवारी दुपारी पीरपिंपळगाव येथील एका मंदिरात लग्न लावण्यासाठी एकत्र आले. त्याचवेळी नामदेव सरोदे याने मुलीच्या नावावर अर्धा एकर शेतजमीन करून द्या, अशी मागणी केली. परंतु, मुलाच्या परिवाराने शेतजमीन नावावर करण्यास नकार दिला. संतोष सरोदे हे मुलीसह पुन्हा घरी आले.

या घटनेमुळे कुटुंबाची बदनामी झाल्याची सल मनात निर्माण होऊन मुलीचे वडील व काकांनी तिला शेतातील कडूलिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास लावला व त्यानंतर तेथेच मुलीचा मृतदेह जाळूनही टाकला.

 या घटनेची माहिती बुधवारी सकाळी खबऱ्यामार्फत मिळाल्याची माहिती चंदनझिरा पोलिसांनी दिली. त्यानुसार पोलिस निरीक्षक रघुनाथ नाचन, पोउपनि. पोहार, पोउपनि. झलवार यांनी घटनास्थळी भेट दिली. प्रारंभी वडील व काकाने मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले. 

मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोहेकॉ. जितेंद्र तागवाले यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि. झलवार करत आहेत.

पुन्हा जिल्हा हादरला : ११ महिन्यात ४४ खून

काही दिवसांपूर्वीच शहरातील चौधरीनगर येथे १४ वर्षांच्या मुलीने ५ वर्षांच्या मुलीचा खून केला होता. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. त्यातच आता वडिलांनीच मुलीचा प्रेमप्रकरणातून खून केला आहे. त्यामुळे जालना जिल्हा पुन्हा हादरला आहे. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या ११ महिन्यांत जवळपास ४४ खून झाले आहेत. वाढत्या खुनांमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.

Post a Comment

0 Comments