google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्ह्यात ठाकरे गटाकडून शिंदे गटाला हादरा !

Breaking News

सोलापूर जिल्ह्यात ठाकरे गटाकडून शिंदे गटाला हादरा !

 सोलापूर जिल्ह्यात ठाकरे गटाकडून शिंदे गटाला हादरा !

सोलापूर- गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे शिवसेनेतून शिंदे शिवसेनेत जाणाऱ्यांची गर्दी होत असतानाच आता शिंदे गटात दाखल झालेले परतीच्या प्रवासाला लागलेले दिसत असून सोलापूर जिल्ह्यात ठाकरे शिवसेनेने शिंदे शिवसेनेला मोठा दणका दिला आहे.

शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे गटाने भाजपशी हातमिळवणी करीत राज्यात सत्ता स्थापन केली आणि तेंव्हापासून शिवसेनेला (उद्धव ठाकरे) राज्यात ओहोटी लागल्याचे चित्र दिसत आहे. अजूनही अनेकजण शिंदे गटात दाखल होत असतानाच सोलापूर जिल्ह्यात मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने शिंदे गटाला धोबीपछाड दिली आहे. 

वाजत गाजत शिवसेनेतून शिंदे गटात गेलेले पदाधिकारी पुन्हा परत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. राज्यात काही ठिकाणी विशेषत: संभाजीनगर येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उद्धव ठाकरे शिवसेनेत दाखल झाले असतानाच सोलापूर जिल्ह्यातही 'घरवापसी' सुरु झाली आहे. 

अक्कलकोट तालुक्यातील शिंदे गटातील तसेच भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षातील पदाधिकारी परत ठाकरे शिवसेनेत दाखल झाले आहेत, शिवाय त्यांनी शिंदे गटातील नेत्यांवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केले आहेत.

 शिंदे गटातील जिल्हा उपप्रमुखासह भारतीय जनता पक्ष, मनसे या पक्षातील पदाधिकारी यांनी ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला असून उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांनी आपली राजकीय खेळी यशस्वी करीत शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे.

 शिंदे गटातील (बाळासाहेबांची शिवसेना) सोलापूर उप जिल्हाप्रमुख मनोज पवार यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह पुन्हा शिवसेनेत (उद्धव ठाकरे) प्रवेश केला आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वीच या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. आता ते परत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत परतले आहेत. 

शिंदे गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह मनसे, भारतीय जनता पार्टीमधील २१ जण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. हा प्रवेश करताना त्यांनी शिंदे गटातील नेत्यांवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. 

 एकनाथ शिंदे यांच्या 'बाळासाहेबांची शिवसेना' पक्षातील अनेक पदाधिकारी हे  केवळ सत्तेसाठी तिकडे गेले  आहेत. काही जण स्वत:ला एकनाथ शिंदे समजू लागले असून ठाकरे गटातून गेलेल्या अनेक पदाधिकाऱ्याना आपली पोळी भाजून घ्यायची आहे.

 या सगळ्यांचे दोन नंबरचे धंदे आहेत. त्यांना अभय मिळावे यासाठी शिंदे गटात दाखल झाले आहेत. असा आरोप शिवसेनेत परत आलेले मनोज पवार यांनी केला आहे. हा शिंदे गट दोन वर्षे देखील टिकणार नसून सगळ्यांची माती होणार आहे  असेही पवार यांनी म्हटले आहे. 

'खोबरं तिकडं चांगभलं' वृत्तीने काहीजण सगळ्याच क्षेत्रात असतात. राजकारणात तर अशा मंडळींची अधिक गर्दी असते. सत्ता फिरेल तसे फिरणारी मंडळी राजकारणात नेहमी दिसत असतात. 

अजून राज्यात एकनाथ शिंदे यांची सत्ता असतानाही काही जण पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेंत सामील होऊ लागली असल्यामुळे सत्ता गेल्यानंतर शिंदे गटाची अवस्था नेमकी कशी होतेय याचे उत्तर काळच देणार आहे. शिवसेना संपली असे म्हणणाऱ्याना मात्र अशा घरवापसीने  मोठी  चपराक बसू लागली आहे.

Post a Comment

0 Comments