सोलापूर ग्रामीणची स्थिती! 'दारूबंदी'चा ठराव झालेल्या गावांमध्येच हातभट्टीची खुलेआम विक्री
ग्रामीणमधील जवळपास दोनशे ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत दारुबंदीचे ठराव केले आहेत. तरीसुध्दा त्या गावांमध्ये हातभट्टी दारू विक्री सुरु असल्याचे चित्र आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने मागील २० दिवसांत जिल्ह्यात ठिकठिकाणी कारवाई करून एक हजार लिटर हातभट्टी आणि जवळपास दहा हजार लिटर रसायन नष्ट केले. हॉटेल, ढाब्यांवरील अवैध विक्रीवर कारवाई केली. पण, ग्रामीण पोलिसांना तेवढी अवैध दारु, रसायन सापडले नाही, हे विशेष.
तत्कालीन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ऑपरेशन परिवर्तनाच्या माध्यमातून हातभट्टी निर्मिती करणारी गावे तथा तांडे आणि तयार झालेली दारू मोठ्या प्रमाणावर विक्री होणाऱ्या गावांची यादी तयार केली होती.
त्या गावांवर दत्तक अधिकारी नेमून वॉच ठेवला होता. त्याचा सकारात्मक परिणाम देखील झाला. पण, आता मागील काही दिवसांपासून ही मोहिम सैल झाल्याने हातभट्टी निर्मिती व विक्री वाढल्याचे चित्र आहे. गावकऱ्यांनी अनेकदा पोलिस ठाण्यांना निवेदने दिली, पण ठोस काहीच कारवाई होऊ शकली नाही.
आता नुतन पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी मुळेगाव तांड्याला भेट देऊन तेथील लोकांना मार्गदर्शन केले. परंतु, कागदोपत्री व प्रत्यक्षातील स्थिती खूप वेगळी आहे. मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर ग्रामपंचायतीने चार-पाच वर्षांपूर्वी दारूबंदीचा ठराव केला.
त्यानंतरगावातील भांडण-तंटे कमी झाले, पण काही दिवसांपासून गावात तीन-चार ठिकाणी हातभट्टी दारू विक्री होत असल्याने पुन्हा परिस्थिती 'जैसे थे' झाली आहे. अशी स्थिती अनेक गावांमध्ये आहे. त्यावर आता पोलिस अधीक्षक सरदेशपांडे कसा ठोस उपाय करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
'राज्य उत्पादन'ला दारू सापडते अन्...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शनिवारी (ता. १९) वडाळा व कळमण (ता. उत्तर सोलापूर) येथे गोवा राज्यनिर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली विदेशी मद्य जप्त केले.
निरीक्षक सदानंद मस्करे यांनी सापळा रचून बार्शीकडे जाणाऱ्या वाहनाला अडवले. तसेच संशयित आरोपीच्या कळमणमधील घरातून देखील मद्यसाठा जप्त केला. श्रीनिवास वाघमारेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होऊन न्यायालयाने त्याला दोन दिवसांची एक्साईज कोठडी ठोठावली.
ही कारवाई निरीक्षक सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक अंकुश अवताडे, गणेश उंडे, गजानन होळकर, जवान अनिल पांढरे, प्रशांत इंगोले, इस्माईल गोडीकट, रशीद शेख, संजय नवले यांच्या पथकाने केली. राज्य उत्पादन शुल्क विभागालआकारवाईत दारू सापडते, मग ग्रामीण पोलिसांना का सापडत नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
अवैध दारुवर पथकांचा वॉच अवैध दारू निर्मिती, विक्री आणि वाहतुकीवर वॉच ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची सहा पथके असून एक विशेष भरारी पथक देखील आहे. सोलापूर विभागाअंतर्गत बार्शी, अक्कलकोट, दक्षिण व उत्तर सोलापूर आणि शहर हद्द असून माळशिरस विभागाअंतर्गत माळशिरस, सांगोला, मंगळवेढा व पंढरपूर विभागाअंतर्गत पंढरपूर, करमाळा, माढा व मोहोळ तालुके आहेत.
- नितीन धार्मिक, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर


0 Comments