इंदापूर तालुक्यातील धक्कादायक घटना ; पूर्वीच्या व्यवहाराच्या वादावरून चार वर्षाच्या मुलाचा खून
इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी नजीक असलेल्या जाधवपाटी येथील चार वर्षाच्या मुलाचा त्याच्या वडिलांशी असलेल्या पूर्वीच्या व्यवहाराच्या वादावरून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना दिनांक २५ ऑक्टोंबर रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
सदर घटनेत अबूजर जब्बार शेख नावाच्या चार वर्षाच्या मुलाचा खून करण्यात आला आहे.
याबाबत मयत मुलाचे वडील जब्बार गफुर शेख ( वय ३६ , रा. सरडेवाडी, जाधवपाटी ता. इंदापूर जि. पुणे ) यांनी फिर्याद दिली असून सदर प्रकरणात आरोपी जयप्रकाश नरहरी देवकाते (रा. सरडेवाडी, जाधवपाटी ता. इंदापूर जि. पुणे) याच्यावर कलम 302 प्रमाणे इंदापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी जब्बार गफुर शेख हे त्यांची आई,पत्नी, दोन मुली,दोन मुले असे एकत्र राहत
असून शेतमजुरी करून कुटुंबाची उपजीविका करतात. फिर्यादीने सन २०२० मध्ये आरोपी जयप्रकाश नरहरी देवकाते याच्याकडून जमीन गट नंबर ७१/१ पैकी ४ आर जागा नोटरी करारनामा करून ५ लाख ५० हजार रुपये रोख स्वरूपात रक्कम देऊन विकत घेऊन राहत होते.
नंतर काही काळाने मूळ जमीन मालक जयप्रकाश नरहरी देवकाते हा जब्बार शेख यांना तू घेतलेली जमीन परत दे नाहीतर मी तुझ्या कुटुंबाला बघून घेईन असा वारंवार धमकी देऊन भांडण करत होता.
दिनांक २४ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ५.०० वाजण्याच्या सुमारास जब्बार शेख यांच्याशी जयप्रकाश देवकाते हा हुज्जत घालून तुला बघून घेतो असे म्हणून निघून गेला. दिनांक २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास
घरातील सर्व घराच्या पाठीमागील बाजूस असताना ४ वर्षाचा अबुजर शेख घराच्या समोर असलेल्या पडवीत चहा, बटर खात बसला होता तेव्हा त्यांना अचानक मोठा आवाज आल्याने सर्वजण पळत आले यावेळी जयप्रकाश नरहरी देवकाते याने आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर नंबर MH -42-F-1248 हा त्यांच्या मुलाच्या अंगावर घालून तो तेथून पळून गेला.
या घटनेत मुलाच्या डोक्याला कानाला व काही इतर जागेवरती गंभीर दुखापत झाली असल्याने त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्या मुलाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे.
सदर घटनेचा पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.


0 Comments