सोलापूर : नऊ वर्षे फरार असलेले तिघे गजाआड
सोलापूर, : सोलापुरात सेवानिवृत्त बँक अधिकार्याला एक कोटी 35 लाख रुपयांना फसविण्यात आले होते.
याप्रकरणी नऊ वर्षांपासून कुटुंबासह फरार दुय्यम निबंधक कार्यालयातील तत्कालीन वरिष्ठ लिपिकासह तिघाजणांना अखेर पोलिसांनी सांगलीतून अटक केली.
नंदकुमार उत्तरेश्वर बोराडे (रा. नाथ संकुल, बेडर पूल, दक्षिण सदर बझार, सोलापूर), त्याची पत्नी सुहासिनी नंदकुमार बोरोडे, भाऊ जगदीश उत्तरेश्वर बोराडे अशी त्यांची नावे आहेत.
त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. याबाबत सेवानिवृत्त बॅक अधिकारी अरूण शंकर गोडसे (रा. मोरया सोसायटी, विजापूर रोड, सोलापूर) यांच्या फिर्यादीवरून डिसेंबर 2013 मधे सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
याबाबत माहिती अशी की, नंदकुमार बोराडे हा दुय्यम निबंधक कार्यालय, सोलापूर येथे वरिष्ठ लिपिक म्हणून शासकीय सेवेत कार्यरत होता. त्यावेळी त्याने त्याच्या पदाचा गैरवापर करत सन 2010 साली त्याची पत्नी सुहासिनी नंदकुमार बोराडे व भाऊ जगदीश उत्तरेश्वर बोराडे यांच्या नावे भाग्यवंती ऍग्रो फर्म्स नावाची भागीदारी संस्था स्थापन केली.
याच दरम्यान दुय्यम निबंधक कार्यालयात प्रतिनियुक्तीने सहनिबंधक पदाचा पदभार घेऊन नंदकुमार बोराडे याने सोलापूरातील बॅक अधिकारी अरूण गोडसे यांचा विश्वास संपादन केला. त्या आधारे होटगी रोड येथील एका आरक्षित जागेचा बनावट नकाशा तयार करून ती जागाआरक्षणविरहित असल्याचे दर्शविले.
त्याने त्या जागेचे विकसनासाठीचे करारपत्र बनविले. त्या आधारे गोडसे यांच्याकडून 1 कोटी 35 लाख रुपये घेतले. त्यानंतर विकसन करारपत्राप्रमाणे 4 महिन्यांच्या आत ही जागा विकसनासाठी प्रत्यक्षात ताब्यात देण्याची ठरले होते.
पण साडेतीन वर्षे उलटून गेली तरीही नंदकुमार बोराडे, त्याची पत्नी सुहासिनी बोराडे, त्याचा भाऊ जगदीश बोराडे हे टाळाटाळ करीत होते. त्यामुळे गोडसे यांचा संशय बळावल्याने त्यांनी याबाबत सखोल चौकशी केली.
त्यावेळी ती जागा आरोग्य केंद्रासाठी आरक्षित असल्याचे समजले. त्यामुळे यासंदर्भात नंदकुमार बोराडे कुटुंबियांकडे त्यांनी पैसे परतीसाठी तगादा लावला. पण यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व जागेचा ताबा विकसनासाठी देण्यास नकार दिला.
त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अरुण गोडसे यांनी पोलिसात धाव घेतली आणि तीनही आरोपीविरोधात कट करून,बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याबाबत सदर बझार पोलीस ठाण्यात डिसेंबर 2013 मधे गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल झाल्यापासून तीनही आरोपी आतापर्यंत कुटुंबासह फरार होते. या कुटुंबाचा जिल्हा न्यायाधीश शब्बीर अहमद औटी यांनी सन 2013-14 मध्ये या तिन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता.
उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयानेही त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यानंतर त्यांना फरार घोषित करीत मालमत्तावर टाच आणली होती व त्यांची बँक खातीही गोठवली होती. तरीही हे आरोपी कायद्याला शरण येत नव्हते. अखेरीस सोलापूर गुन्हे शाखेने त्यांना 12 ऑक्टोबर 2022 रोजी सांगलीतून ताब्यात घेऊन अटक केली होती.
तिन्ही आरोपींना अटक करुन सोलापूर येथील न्यायालयात हजर केले असता मुख्य न्यायदंडाधिकारी भंडारी यांनी त्यांना सोमवारअखेर (दि. 17) पोलिस कोठडी सुनावली होती. आज त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता तपासअधिकार्यांनी पोलिस कोठडीचे हक्क अबाधित ठेवत न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
याप्रकरणात सरकारच्यावतीने अॅड. अमर डोके, मूळ फिर्यादीकडून अॅड. महेश जगताप तर आरोपीकडून अॅड. बागवान हे काम पहात आहेत.


0 Comments