प्रती तुळजापूर श्री क्षेत्र टेरव एक पुरातन जागृत देवस्थान
देवभूमी कोकण :-
कोकण भूमी ही छत्रपती श्री शिवाजी महाराज तसेच छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने आणि पराक्रमाने पावन झालेली भूमी आहे आणि कोकणच्या इतिहासात याला फार मोठे महत्व आहे. सह्याद्रीचे सानिध्य लाभलेली,
नयनरम्य समुद्र किनारे असलेली निसर्गरम्य भूमी म्हणजेच कोकण भूमी. नैसर्गिक सौंदर्यांबरोबरच कोकण भूमीओळखली जाते ती तिच्या कुशीत वसलेल्या अनेक जागृत देवस्थानांमुळे. प्रत्येक गावाच्या मंदिराची कथा निराळी
आणि तिथे साजऱ्या होणा-या उत्सवांची प्रथाही तितकीच निराळी. एक स्वतंत्र भक्तिभावपूर्ण कथा असलेली, हीदेवस्थाने गावकऱ्यांच्या नितांत श्रद्धेमुळे आणि त्या देवस्थानांच्या ऐतिहासिक तसेच भौगोलिक सुंदरतेमुळे कोकण दर्शनास आलेल्या प्रत्येक पर्यटकास भारावून टाकतात.
पुरातन जागृत देवस्थान :-
असेच एक जागृत देवस्थान म्हणजे चिपळूण तालुक्यातील टेरव गावचे कुलस्वामिनी श्री भवानी-वाघजाई मंदिर.गावकऱ्यांची व भाविकांची नितांत श्रद्धा असणारे तसेच प्रेरणादायी इतिहास असलेले हे देवस्थान प्रति तुळजापूर म्हणून
नावारुपास येत आहे. या देवस्थानास पाचशे वर्षांची फार पुरातन अशी परंपरा व ऐतिहासिक अधिष्ठान आहे.
पर्यटन क्षेत्र :-
चिपळूणपासून काही अंतरावर निसर्गाच्या कुशीत टेरव गाव वसले आहे. आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा, कडेकपारीतून फेसाळत कोसळणारे धबधबे, दाट धुके, निरव शांतता, हिरवीगर्द वनराई, दाट जंगले,
छातीचे ठोके चुकविणारे भव्य कडे, हिरवा शालू पांघरलेली शेती, झाडांवर व वेलींनवर उमललेली विविध रंगीबेरंगी फुले, त्यांच्याशी हितगुज साधणारे पशु-पक्षी यांचा मंत्रमुग्ध करणारा आवाज, निसर्ग सौंदर्याची मुक्त उधळण तसेच
कुलस्वामिनी श्री भवानी-वाघजाई देवीचे भव्य-दिव्य आणि शिल्पकलेचा एक अनोखा नमुना असलेले हे मंदिर पर्यटकांनाव भाविकांना श्री क्षेत्र टेरव या गावास भेट देण्यास आकर्षित करतात. तत्कालीन पालकमंत्री मा. श्री भास्करराव जाधव यांच्यासहकार्याने महाराष्ट्र शासनाने सदर मंदिरास पर्यटन स्थळाचा 'क' दर्जादेखील बहाल केला आहे.
इतिहास :-
१५ व्या आणि १६ व्या शतकामध्ये कोकणातील या प्रदेशांवर आदिलशहा बादशहाचा अंमल होता. त्याचा एक सरदार बाररावकोळी हा चिपळूण परिसरातील मौजे पेढांबे, खडपोली आणि कळकवणे या गावांच्या सीमा मध्यावर
१५०० फूट उंचीवरील डोंगरावर बारवाई या किल्ल्याचा किल्लेदार होता. त्याने बादशहाचा अंमल झुगारुन दिला आणि बादशहाची दाभोळ बंदरामार्गे होणारी रसद तोडली. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी बादशहाने आकुःसखान,शेखबहादूर व भाईखान या तीन मातब्बर सरदारांना पाठविले पण बारराव कोळ्याने त्यांचा पराभव केला व त्यांच्या सैन्याची अतोनात हानी केली.
त्रस्त झालेल्या बादशहाच्या आवाहनाप्रमाणे कदम घराण्याचे पूर्वज सरदार दुर्गोजीराव कदम आणि त्यांचे सासरे सरदार सोमाजीराव शिंदे यांनी बारराव कोळ्याच्या बारा भावांचा गनिमी काव्याने पराभवकेला. या मोहिमेच्या यशाने खुश होऊन बादशहाने त्यांना २८ गावांची जहागिरी दिली, त्यापैकी आठ गावे सरदारदुर्गोजीराव कदम यांना आणि उर्वरीत गावे सरदार सोमाजीराव शिंदे आणि त्यांचे बंधू यांना बहाल केली.
स्थापना :-
टेरव गाव हे सरदार दुर्गोजीराव कदम यांना जहागिरीत मिळालेले एक गाव असून त्यांनी आपल्या गळ्यात कवड्याच्या माळा घालून तुळजापूर येथून कुलस्वामिनी श्री भवानी मातेची प्रतिकृती या गावात आणली.
पाचशे वर्षापूर्वी सन १५१० - १५१२ साली कुलस्वामिनी श्री भवानी देवीची, ग्रामदैवत वाघजाईसह प्रतिष्ठापना केली. अतिशयरेखीव अशा हेमाडपंथी दगडाच्या कोरीव अष्ट खांबावर ही दोन मंदिरे बांधण्यात आली होती. कालांतराने हनुमानाचे तिसरे मंदिर बांधण्यात आले. तसेच लिंगवणे येथीलपुरातन स्वयंभू शंकर मंदिर हे ही या देवस्थानाचाच एक भाग आहे. भोपे कदमांचे वंशज आजही तुळजापूर येथे कुलस्वामिनी श्री भवानी मातेच्या सेवेत आहेत.
जिर्णोद्धार :-
मंदिराचा प्रथम जिर्णोद्धार इ. सन १८३९ साली झाला होता. सदर पुरावा सन २००३ साली मंदिराचा दुस-यांदाजिर्णोद्धार करताना केलेल्या उत्खननात सापडला आहे. दिनांक ८ मे २०११ रोजी या नूतन मंदिराचे उद्घाटन व कलशारोहण श्रीमत् जगतगुरु शंकराचार्य, करवीर पीठ, कोल्हापूर, यांचे शुभहस्ते करण्यात आले. सर्वांच्या सहकार्यानेतसेच श्री दशरथ पांडुरंगराव कदम अध्यक्ष असलेल्या श्री कुलस्वामिनी भवानी-वाघजाई जिर्णोद्भार ट्रस्टच्या माध्यमातून अंदाजे सव्वा ते दीड कोटीहून अधिक रुपयांच्या योगदानातून या मंदिराची नव्याने उभारणी करण्यात आली.
मार्ग आणि स्थापित दैवते :-
सदर मंदिर चिपळूण शहरापासून ८ कि.मी अंतरावर तसेच मुंबई-गोवा महामार्गावरुन कामथे येथून २.५ कि.मी अंतरावर आहे. कामथे, खेर्डी, कातळवडी तसेच धामणवणे येथून या देवस्थानाकडे जाण्यासाठी मार्ग आहेत. मंदिराच्या दक्षिणेकडील गाभार्यात मुख्य देवता महिषासुरमर्दिनीच्या रुपातील श्री कुलस्वामिनी भवानीची साडेसात फूट उंचीची तसेच अडीच टन वजनाची अतिशय सुंदर, रेखीव व तेजस्वी अशी दशभुजामूर्ती प्रतिष्ठापित केली आहे.
आई भवानीच्या उजव्या बाजूला भैरीची मूर्ती तर डाव्या बाजूला महालक्ष्मीची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. या मंदिराच्या उत्तरेकडील गाभाऱ्यामध्ये ग्रामदेवता श्री वाघजाईची सुंदर व रेखीव अशी मूर्ती आहे. तिच्या उजव्या बाजूला केदारची मूर्ती असून डाव्या बाजूला कुलस्वामिनी व स्वयंभू कालिका मातेचे स्थान आहे. तसेच महापुरुष व पावका यांची ही स्थापना करण्यात आली आहे
या मंदिराच्या पूर्वेकडील गाभाऱ्यामध्ये नव्याने शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धीदात्री या नवदुर्गांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तसेच पश्चिमेकडील गाभा-यामध्ये भगवान महादेवाच्या पिंडीची प्रतिष्ठापना करुन त्यासमोर श्री गणेशाची मूर्ती आहे. भवानी देवीच्या मागे सुबक हनुमान मंदिर बांधण्यात आले असून तेथे पुरातनरेखीव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ८ डिसेंबर २०२१ रोजी करण्यात आली. सदर मंदिरासमोर सभागृह बांधण्यात
आले असून सभागृहाच्या बाजूला जुन्या मुर्त्यांचे संग्रहालय करण्यात आले आहे.
मंदिराची रचना :-
मंदिराची एकूण लांबी १२३ फूट व रुंदी ६५ फूट आहे.पायाची उंची ४ फ़ूट व आतील उंची २२ फूट आहे.मंदिराला एकूण ४ गाभारे असून, चारही गाभाऱ्यांवर मंदिराच्या उर्ध्वभागी दाक्षिणात्य घाटांचे अत्यंत शोभायमान वरेखीव कळस आहेत, त्यावर अत्यंत सुबक व सुंदर कलाकृती करण्यात आली आहे.
एका कळसावर श्री हनुमानाची ध्वजांकित छोटी मूर्ती विराजमान आहे. भवानी देवीच्या गाभाऱ्याच्या कळसाची उंची जमिनीपासून ६५ फूट आहे.मंदिरात दोन हजार भाविक बसू शकतील एवढे प्रशस्त सभागृह असून, सभागृहाच्या पहिल्या मजल्यावर १०० फुटांचा सुंदर सज्जा बनविला आहे. सज्जाला पूर्वपश्चिम नक्षीदार चक्रांकित १६ खिडक्या आहेत. सभागृहाला पूर्वपश्चिम ३ x ३ असे वेलबुट्टी चित्रित खांब आहेत. सहा फूट रुंदीची दोन महाद्वारे असून, महाद्वारांच्या दर्शनी भागांवर दुतर्फा
दोन द्वारपाल, प्रवेशद्वारावर वीणाधारी स्त्री, मूदुंगधारी व टाळ वादन करणारे पुरुष व आदरपूर्वक नमस्कार करणारी ललना अशी शिल्पे कोरली आहेत. दोन्ही प्रवेशद्वारालगत तसेच सज्जाकडे जाणार्या प्रवेशद्वारावर नृत्याप्सरा व ध्यानस्थ देवी, गवाक्षांवर मोर, कपोत, हंस तसेच मंदिराच्या बाहेरील भिंतीवर श्री विष्णुंची दशावतारी कोरीव शिल्पे साकारली आहेत.
प्रशस्त उद्यान :-
या देवस्थानच्या सभोवताली अडीच एकराच्या परिसरामध्ये अतिशय रमणीय आणि सुंदर उद्यान असून ते गुलाब,जाई-जुई, कमळ, जास्वंद, झेंडू, सोनचाफा इत्यादी सुंदर फुलांनी बहरलेले असते. या प्रशस्त उद्यानामुळे देवस्थानास
अधिकच शोभा लाभली आहे. मंदिराच्या संरक्षक भिंतीच्या सभोवताली १०५ कल्पवृक्ष आहेत. मंदिरालगत आंबा, ऐन,किंजळ, साग, पिंपळ इत्यादी असंख्य वृक्ष असलेली देवस्थानच्या स्थापनेपासूनची सतरा एकरची हिरवीगार देवरहाटी
आहे.
धार्मिक उत्सव :-
या पुरातन देवस्थानामध्ये वर्षभरात विविध धार्मिक उत्सव साजरे केले जातात. चैत्र पौर्णिमेला देवीची वार्षिक महाजत्रा भरते. मौजे कामथे व चिंचघरी येथील ग्रामदेवतांच्या पालख्या वाजतगाजत मिरवणुकीने टेरव येथे रात्रौ आपल्या ज्येष्ठ
भगिनीच्या भेटीस येतात. तीन वर्षांनी एकदा होणाऱ्या त्रेवार्षिक समा या जत्रेला लाट चढविली जाते. वार्षिक तसेच समा जत्रेस ग्रामस्थांसह माहेरवाशिणी, मुंबई, ठाणे, पुणे व सुरत या व इतर शहरातून चाकरमानी तसेच अन्य गावांतून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्याचबरोबर गुढीपाडवा, शिमगा, नवरात्रौत्सव, ज्ञानेश्वरी पारायण, भजन, कीर्तन, हरिनाम सप्ताह,दिपोत्सव आणि वर्धापनदिन असे अनेक उत्सव वर्षभर साजरे केले जातात. नवरात्रौत्सव, वर्धापनदिनी तसेच
हरिनाम सप्त्यात सर्व भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात.
मंदिराशेजारी होमाची पारंपारिक जागा असून जवळच एक प्रशस्त रंगमंच आहे. रंगमंचासमोर हजारो भाविक बसू शकतील असे विस्तीर्ण पटांगण असून सदर ठिकाणी चैत्र पौणिमा, वर्धापन दिन इ. उत्सवांदरम्यान करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
भाविकांना आलेले दृष्टांत :-
१) टेरवची भवानी माता हे एक अत्यंत जागृत देवस्थान आहे. श्रद्धा व भक्तीभावाने केलेल्या पूजेला तसेच भक्तांच्याहाकेला ती धावते आणि संकट निवारण करते असा येथील ग्रामस्थ व भाविकांचा विश्वास आहे. याबाबत एकअनुभव ग्रामस्थ कथन करतात की, सन २००८ साली दक्षिण दिशेला मंदिराकडे झुकलेला विस्तीर्ण असा
वटवृक्ष होता. मंदिराचे काम सुरु असताना कळसाला अडसर होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी जेसीबीच्या साहाय्यानेहा वृक्ष तोडण्याचा निर्णय घेतला. एवढा मोठा वृक्ष तोडताना कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये म्हणून देवीला साकडे घालण्यात आले. दुसर्या दिवशी वटवृक्ष तोडण्यासाठी जेव्हा ग्रामस्थ मंदिर परिसरात आले त्यावेळी
कोणीतरी एखादं रोपटं मुळासकट उपटावे व बाजूला ठेवावे तद्वत तो वटवृक्ष मुळासकट उखडून मंदिराच्याविरुद्ध दिशेला पडलेला आढळला. ते दृश्य पाहून आश्चर्यचकीत झालेल्या ग्रामस्थांनी नतमस्तक होऊन मातेचरणी श्रीफळ अर्पण करुन कृतज्ञता व्यक्त केली.
२)सन २०११ मध्ये पुन्हा एकदा येथील ग्रामस्थांना असाच अविस्मरणीय अनुभव आला. कारकळा, कर्नाटक येथून
आणलेली २.५ टन वजनाची व ७.५ फूट उंचीची अखंड काळ्या पाषाणातील भवानी मातेची मूर्ती मंदिरात
गाभाऱ्याजवळ आडवी ठेवण्यात आली होती. दि. ३ मे २०११ रोजी देवीला श्रीफळ अर्पून मूर्ती आसनावर
ठेवण्याचे काम कारकळाहून आलेल्या कुशल कामगारांकडून सुरु झाले. परंतू मूर्ती जागेवरुन हललीच नाही. दि.
४ मे रोजी पुन्हा एकदा भवानी मातेचा प्रचंड जयघोष करुन भक्तगण व कामगार मूर्ती आसनावर ठेवण्याचे
आटोकाट प्रयत्न करु लागले, परंतू तेही प्रयत्न असफल ठरले. भक्तगणांनी व कामगारांनी हात न टेकता दि. ५
मे रोजी प्रयत्न सुरुच ठेवले. तिसर्या दिवशी देखील हे प्रयत्न निष्फळ होत असल्याचे लक्षात येता अचानक एक
चमत्कार झाला आणि तीन दिवस न हलणारी मूर्ती साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच अक्षय्य तृतीयेच्या
शुभ मुहूर्तावर सायंकाळी ६ वाजून २९ मिनिटांनी हलकीफुलकी होऊन सहजगत्या उचलली गेली व तिच्या
आसनावर विनासायास काही क्षणात स्थानापन्न झाली. ४० ते ४२ तासांच्या प्रतिक्षेनंतर भवानी मातेने केलेला हा चमत्कार पाहून उपस्थितांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिराव्यतिरिक्त महाराष्ट्रात, टेरव येथे असे हे एकमेव भव्यदिव्य भवानी मंदिर आहे, त्यामुळे या देवीच्या दर्शनास राज्यातूनच नव्हे तर देशाच्या विविध भागातून अनेक जाती-धर्माचे लोक येत
असतात. जागृत........... नवसाला पावणारी.......... संकट विमोचक आणि भक्तांच्या हाकेला धावून येणारी असा या मातेचा तसेच ग्रामदैवत श्री वाघजाई मातेचाही लौकिक आहे. स्वयंभू कालिका माता ही माहेरवाशिनिंच्या हाकेला धावून येणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक भाविक संतती प्राप्ती, शिक्षण, नोकरी-धंदा तसेच इतर अनेक बाबतीत केलेले नवस फेडून विविध देवतांच्या चरणी नतमस्तक होतात. तसेच लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, पत्रकार,
शासकीय कर्मचारी हेही विविध धार्मिक उत्सवांच्या वेळी दर्शनाने कृतकृत्य होतात.
व्यवस्थापन :-
ग्रामस्थ कसलाही मोबदला न स्विकारता सर्व प्रकारची सेवा बजावून मंदिराचे व्यवस्थापन पार पाडतात.शेवटी, एवढेच म्हणावेसे वाटते की,
जे जे सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वाला नेई!
माय भवानी तुझे लेकरु कुशीत घे आई सेवा मानून घे आई!!



0 Comments