चिमुकल्यांना सांभाळा.. कोरोनानंतर वाढतोय ‘या’ जीवघेण्या आजारांचा संसर्ग…!!
कोरोना महामारीतून नागरिक सावरत असतानाच, ‘मंकीपाॅक्स’ एका संसर्गजन्य आजाराने जगभर पाय पसरले आहेत. आफ्रिकेत पहिल्यांदा या आजाराचे रुग्ण आढळून आले. जगभरात आतापर्यंत ‘मंकीपॉक्स’ची 15,000 हून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. त्यात भारतातही या आजाराचे 3 रुग्ण आढळले आहेत..
कोरोना, मंकीपाॅक्सची दहशत कायम असतानाच टोमॅटो ताप, स्वाइन फ्लू व जपानी ‘एन्सेफलायटीस’, डेंग्यूसह अनेक आजारांचा संसर्ग वाढत आहे. विशेषत: लहान मुलांना या आजारांचा सर्वाधिक धोका आहे. मुलांमध्ये झपाट्याने त्याचा प्रसार होण्याची शक्यता असल्याने पालकांची चिंता वाढली आहे.
डेंग्यूचा फैलाव..
पावसाळा सुरु झाला असून, वातावरणात बदल झालाय. त्यामुळे मुलांमध्ये डेंग्यु आजाराचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: शहरी भागात डेंग्यूबाधित रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने लहान मुलांचा समावेश असल्याचे दिसते. कर्नाटक व तेलंगणामध्येही लहान मुलांमध्ये डेंग्यूची प्रकरणे आढळून आली आहेत. तसेच आसाममध्ये ‘जपानी एन्सेफलायटीस’चा संसर्ग वाढत असल्याचे समोर आलंय. या महिन्यात या आजारामुळे बळी गेलेल्या नागरिकांचा आकडा 38 वर पोहोचलाय. प्रामुख्याने हा आजार मुलांना होत असून, त्यात मृत्यू दर 30 टक्क्यांपर्यंत असल्याचे सांगण्यात आले..
जून महिन्यात महाराष्ट्रात ‘स्वाइन फ्लू’चे (H1N1) रुग्ण वाढले होते. राज्यात 22 जूनपर्यंत ‘स्वाइन फ्लू’चे 142 हून अधिक रुग्ण आढळले होते. त्यात 5 वर्षाखालील मुलांचे प्रमाण अधिक असल्याचे सांगण्यात आले..
काही दिवसांपूर्वी केरळमध्ये ‘टोमॅटो तापा’चा फैलाव झाला हाेता. हा आजारही प्रामुख्याने 5 वर्षांखालील मुलांना होत असल्याचे समोर आलेय.. केरळमध्ये आतापर्यंत टोमॅटो तापाच्या संसर्गाची 80 प्रकरणे नोंदवली गेल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पालकांमध्ये काळजीचे वातावरण आहे..


0 Comments