अबब घरात नोटांचा ढीग; पैसे मोजता मोजता ईडीच्याही नाकी नऊ
शिक्षण भरती घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्तींच्या 13 ठिकाणांवर छापेमारी केली आहे. यावेळी निकटवर्तीच्या घरातून सुमारे 20 कोटींची रोकड जप्त केली आहे.
पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री पार्थ चटर्जी यांचे निकटवर्तीय असलेल्या अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून ही रोकड ईडीने जप्त केली आहे. ही रोकड इतक्या मोठ्याप्रमाणात होती की, ईडीने बँकेचे अधिकारी बोलावले आहे. कारवाईत ईडीने अर्पिता यांच्या घरातून रोकडसह 20 मोबाईल जप्त केले आहेत. ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात पार्थ सध्या उद्योग आणि वाणिज्य मंत्री आहेत. हा कथित घोटाळा झाला तेव्हा ते शिक्षण मंत्री होते.
सीबीआयने त्यांची याप्रकरणी दोनदा चौकशी केली. याच चटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली. यावेळी ईडीने 20 कोटी रुपयांची रोकड आणि 20 मोबाईल जप्त केले. ही जप्त केलेली रक्कम आणि मोबाईल स्कूल सर्व्हिस कमिशन घोटाळ्याशी संबंधित असल्याचा ईडीला संशय आहे.
दरम्यान अर्पिता यांच्याशिवाय ईडीने शिक्षण राज्यमंत्री परेश सी अधिकारी तसेच आमदार माणिक भट्टाचार्य तसेच अन्य काही व्यक्तींवर कारवाई केल्याची माहिती समोर येतेय. परेश चंद्र यांच्या कूचबिहार जिल्ह्यातील मेखलीगंज येथील निवासस्थानांवर छापे टाकले.


0 Comments