सोलापूर जिल्हा परिषदेच्या 77 जागेसाठीचे आरक्षण ; 28 जुलै रोजी आरक्षण होणार जाहीर
सोलापूर : महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ मधील कलम १२ उपकलम (१), कलम ५८(१)(अ) प्रमाणे व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) आरक्षण प्रवर्ग ठरविण्यासाठी गुरूवारी (दि.28 जुलै) रोजी नियोजन भवन येथे बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
जिल्हा परिषदेमध्ये सदस्यांची संख्या आता 68 वरून 77 वर गेली आहे त्यामुळे, आता येत्या 28 जुलै रोजी दुपारी तीन वाजता नियोजन भवन या ठिकाणी विशेष सभेमध्ये आरक्षण काढले जाणार आहे. लोकसंख्येच्या आधारे हे आरक्षण काढले जाणार असून जिल्हा परिषदेच्या 77 मतदारसंघातील लोकसंख्या ही 2798843 इतकी आहे.
त्यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 422726 असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 47906 आहे. 77 सदस्यांमध्ये 39 महिला असणार आहेत.
अनुसूचित जाती एकूण 12 जागा त्यात 6 महिला आहेत. अनुसूचित जमातीची एकच जागा आहे ती यंदा महिलेसाठी राखीव आहे. ओबीसीसाठी 20 जागा आहेत त्यात 10 महिला असतील. सर्वसाधारण गटाच्या 44 जागा असतील त्यात 22 महिलांसाठी राखीव होतील. पंचायत समितीच्या 154 जागेसाठी त्या त्या तहसील कार्यालयात 28 जुलै रोजीच आरक्षण काढले जाणार आहे.
आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचा दिनांक 29 जुलै 2022 हा असेल तसेच 29 जुलै 2022 ते 2 ऑगस्ट 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत हरकती व सूचना सादर करता येतील.


0 Comments