गणेशोत्सव, दहीहंडीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, ‘असे’ साजरे होणार सण…
गेली दोन वर्षे देशासह महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरु होता. त्यामुळे सारं काही ठप्प झालं होतं.. ना कोणता सण साजरा होत होता, ना उत्सव.. कोविड निर्बंधामुळे साऱ्या आनंदावरच पाणी सोडावं लागलं होतं.. आता कोरोनाचं सावट संपल नसलं, तरी बऱ्यापैकी ते कमी झालंय.. त्यामुळे राज्य सरकारने गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाबाबत मोठा निर्णय घेतलाय.शिंदे सरकारने यंदाचा दहीहंडी व गणेशोत्सव कोविड निर्बंधमुक्त साजरा करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली..
ते म्हणाले, की “गेली दोन वर्षे कोरोनामुळे सर्व सण-उत्सवांवर मर्यादा होत्या, निर्बंध होते. इच्छा असूनही हे उत्सव धुमधडाक्यात साजरे करता आले नाहीत. मात्र, यंदा सर्व मंडळांचा उत्साह व गेल्या 2 वर्षांतील मर्यादा पाहता, यंदा गणेशोत्सव, दहीहंडी व नवरात्र उत्साहात साजरे व्हावेत, असाच साऱ्यांचा कल आहे.. त्यामुळे यंदा सर्व उत्सव कोविड निर्बंधमुक्त साजरे होतील. कायदा-सुव्यवस्था राखून हे सण साजरे व्हावेत, अशा सूचना पोलिसांना केल्या आहेत.”
गणेश मूर्तीच्या उंचीवर मर्यादा नाही..
गणेश आगमन व विसर्जन मिरवणुका काढता येणार आहेत. त्यासाठीच्या मार्गांवरील खड्डे तातडीने बुजवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, मंडप उभारणीसाठीच्या परवानग्या मिळण्यासाठी एक खिडकी योजना, ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुटसुटीत केली आहे. गणेश मंडळांना नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. कोरोनामुळे गणेश मूर्तीच्या उंचीवर मर्यादा घातली होती. मात्र, आता ही मर्यादा काढून टाकल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
मंडळांना हमीपत्रातून सूट
गणेश मंडळांकडून हमीपत्र घेतले जात होते. आता ते घेण्यास मनाई केली आहे. वर्षानुवर्ष गणेशोत्सव करणाऱ्यांकडून हमीपत्र घेऊ नका, अशा सूचना केल्या आहेत. मात्र, नियमांचं पालनं करावं लागेल, पण त्याचा बागुलबुवा उभा करू नये, अशी सूचना केलीय.. मुंबईत जी नियमावली असेल, तीच राज्यभर लागू करण्याच्या सूचना केल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले..
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यासाठी एसटी बस वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई, पुणे, कोल्हापूर मार्गे आणि कोकणात टोलमाफी देण्याचा मोठा निर्णय घेतल्याचेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले..


0 Comments