चौदाशे रुपयांसाठी मित्रांनीच केली मित्राची हत्या
औरंगाबाद : तीन मित्रांनी चोरी केलेल्या पाईपच्या पैशाच्या वाटणीवरुन, एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचा गळा आवळून खुन केल्याची धक्कादायक घटना, आज औरंगाबाद शहरातील जाधववाडी परिसरात घडली आहे. युसुफ खान असे खुन झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव असून याप्रकरणी जिन्सी पोलीसांनी त्याच्याच दोन मित्रांना अटक केली आहे.
सय्यद आमीर सय्यद सलीम वय वर्ष २१ आणि फिरोज शेख वय वर्ष २७ अस अटक करण्यात आलेल्या दोन तरुणांची नावे आहेत. मयत युसुफ खान याच्या वडिलांनी काल जिन्सी पोलीस ठाण्यात युसुफ हा ११ तारखेपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार जिन्सी पोलीसांनी तो अल्पवयीन असल्याने कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला होता.
त्यानंतर आज दुपारच्या सुमारास जाधववाडी परिसरात एक मृतदेह आढळल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानंतर चौकशी अंती हा मृतदेह युसुफचा असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलीसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवले असून दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपी रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहेत का याचा शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणी अधिक तपास जिन्सी पोलीस करत आहेत. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


0 Comments