साखरपुडा असल्याचे सांगून उरकला बालविवाह चिणके येथील घटना ; नवरदेवासह १० जणांवर गुन्हा दाखल
महुद : मुलगी अल्पवयीन असताना वधू - वर पित्याने पुजारी यांना मंदिरात साखरपुड्याचा कार्यक्रम घेणार असल्याचे खोटे सांगून त्यांच्या परस्पर साखरपुड्याच्या कार्यक्रमात मुलीच्या मनाविरुद्ध बालविवाह लावून दिला . ही घटना १५ एप्रिल रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास चिणके ( ता . सांगोला ) येथील सोनारसिद्ध मंदिरात घडली . याबाबत मंदिराचे पुजारी अशोक सोपान मिसाळ ( रा . चिणके - चव्हाण मळा ) यांनी १२ जून रोजी फिर्याद दिली आहे .
पोलिसांनी सागर भगवान बनसोडे (नवरदेव) , भगवान बनसोडे ( वडील ) व सुमन बनसोडे ( आई , तिघेही रा . कमलापूर ) , तर विठ्ठल दत्तात्रय वसेकर ( मुलीचे वडील ) व उषा विठ्ठल वसेकर ( आई , दोघेही रा . मेडशिंगी , ता . सांगोला ) पुरोहित दत्तात्रय देशपांडे ( रा . नाझरे ) सह इतर तीन ते चार अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .
चिणके येथील अशोक सोपान मिसाळ यांच्याकडे घराजवळील सोनारसिद्ध मंदिरात दैनंदिन पूजेबरोबर मंदिरात होणारे धार्मिक विधी कार्यक्रम पार पाडण्याची जबाबदारी आहे . १५ एप्रिल रोजी सकाळी १० च्या सुमारास कमलापूर येथील भगवान बनसोडे व त्याच्यासोबत विठ्ठल वसेकर ( रा . मेडशिंगी , ता . सांगोला ) असे दोघेजण त्यांच्या घरी येऊन सायंकाळी ६ च्या सुमारास आम्हाला मंदिरामध्ये सागर भगवान बनसोडे याचा साखरपुड्याचा कार्यक्रम घ्यावयाचा आहे , असे म्हणाले .
यावेळी त्यांना मिसाळ हे दहिवडी , ता . तासगाव येथेपाहुण्यांकडे जाणार असल्याने त्यांना कार्यक्रम घेण्यास सांगून त्याच दिवशी दुपारी ४ वाजता निघून गेले . दरम्यान , १६ एप्रिल रोजी पहाटे ५ च्या सुमारास अशोक मिसाळ दैनंदिन पूजा करण्याकरिता सोनारसिद्ध मंदिरात गेले असता त्यांना मंदिरात सर्वत्र अक्षता ( तांदूळ ) पडल्याचे दिसून आले . त्यांनी या प्रकाराबाबत भगवान बनसोडे यांच्याकडे विचारणा केली . तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी साखरपुडा झाल्याचे सांगितले .
दुसरीकडे , साखरपुड्याच्याकार्यक्रमात बालविवाह झाल्याची गावात चर्चा सुरू होती . परंतु या बालविवाहास कोण - कोण उपस्थित होते , हे त्यांना माहीत नव्हते . दरम्यान , ११ जून रोजी चिणके गावचे पोलिस पाटील गोरख तात्या पाटील यांनी त्या मुलीस १८ वर्षे पूर्ण झाली नसताना साखरपुड्यातच तिचा बालविवाह झाल्याचे सांगितले . नाझरे येथील भटजी दत्तात्रय देशपांडे यांना पुरोहित केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे .


0 Comments