सांगोल्यात पंचायत राज समिती सदस्यांकडून समाधान आणि खडेबोलही सुनावले
पत्रकारांशी बोलताना आमदार अनिल पाटील म्हणाले, पंचायत समितीतील काही विभागाचे लिखित स्वरूपाचे कामकाज सकारात्मक आहे. काही विभागाने वेळेवर शासकीय निधी खर्च केला नाही, याचा खुलासा संबंधित अधिकारी जिल्हा परिषदेच्या बैठकीत देतील. खुलासा व्यवस्थित सादर न केल्यास संबंधित विभागाचा अहवाल मंत्रालयातील विभागाकडे पाठविण्यात येणार आहे.
विधीमंडळाने नियुक्त केलेल्या पंचायत राज समितीने गुरुवार, 16 जून रोजी सांगोला पंचायत समितीला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. कामकाजाची पाहणी होणार असल्याने कार्यालयाची रंगरंगोटी, कागदपत्रांची जुळवाजुळव, कार्यालयाचा नियोजनबद्ध अहवाल तयार करण्यात आला होता. पीआरसीच्या पाहणी दौऱ्यात पंचायत समितीच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले आहे. यावेळी ज्या विभागाचे कामकाज समाधानकारक नाही अशा विभागाच्या अधिकाऱ्यांना समितीच्या सदस्यांनी खडे बोल सुनावले.
पंचायत समितीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी पंचायत राज समितीचे सदस्य सांगोल्यात आले होते. यावेळी पंचायत समितीच्या कार्यालयात समितीतील सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या समितीत आमदार अनिल पाटील, आमदार सदाशिव खोत, आमदार डॉ.देवराव होळी, आमदार किशोर दराडे, महाराष्ट्र विधिमंडळाचे कक्ष अधिकारी प्रकाश थिटे, प्रतिवेधक मैत्रेय कुलकर्णी, संपर्क अधिकारी तथा कृषि विकास अधिकारी विवेक कुंभार यांचा समावेश होता. यावेळी गटविकास अधिकारी आनंद लोकरे, सहाय्यक गटविकास अधिकारी विकास काळोखे, सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार अनिल पाटील म्हणाले, पंचायत समितीतील काही विभागाचे लिखित स्वरूपाचे कामकाज सकारात्मक आहे. काही विभागाने वेळेवर शासकीय निधी खर्च केला नाही, याचा खुलासा संबंधित अधिकारी जिल्हा परिषदेच्या बैठकीत देतील. खुलासा व्यवस्थित सादर न केल्यास संबंधित विभागाचा अहवाल मंत्रालयातील विभागाकडे पाठविण्यात येणार आहे.
या दौऱ्यात महूद ग्रामपंचायतीला भेट देण्यात आली. काही तक्रारी आलेल्या होत्या. ऑडिट रिपोर्ट मध्ये दोष निघाला होता. आलेल्या तक्रारींचे एक महिन्यात निवारण करून त्यावर निर्णय घेवून समितीकडे सोपवण्यात यावा असे आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
दर पाच वर्षांनी पंचायत राज कमिटीचा दौरा असतो. पंचायत राज समितीच्या पाहणी दौऱ्यानिमित्त पंचायत समितीत रंगरंगोटी व दप्तर व्यवस्थीत लावण्याचे काम युद्धपातळीवर केले होते. तपासणी पथक येणार म्हणून कधी नव्हे ते पंचायत समितीचा परिसर स्वच्छ करून चकाचक केला होता.
परिसर पाण्यानेधुऊन घेऊन ठिकठिकाणी रांगोळ्या काढल्या होत्या. एरव्ही मोटरसायकली कुठेही लावल्या जात असल्या तरी आज मात्र गाड्यांच्या सोयीसाठी पार्किंगची स्वतंत्र सोय केली होती. एकंदरीत तपासणी पथकाला पंचायत समितीत कायमस्वरूपी स्वच्छता असते असे भासविण्याचा आटोक्यात प्रयत्न केला होता. अशीच स्वच्छता व टापटीप कायमस्वरूपी असावी अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात होती.


0 Comments