७ जणांकडून सतत दीड वर्ष तरुणीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पिडीतेच्या मैत्रिणीची मदत!
कल्याण : कल्याणमधील एका तरूणीला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत, एका मुलीच्या मदतीने, ७ तरुणांनी पीडीतेवर गेल्या दीड वर्षापासून लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या तरुणांच्या त्रासाला कंटाळून या तरुणीने राहत्या इमारतीच्या गच्चीवरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी पोलिसांना मुलीच्या मोबाईलमध्ये सुसाईड नोट मिळाली असून कोळशेवाडी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. याबाबत कोळसेवाडी पोलिसचे सिनियर PI बशीर शेख यांना संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही दरम्यान, आरोपींमध्ये एका तरुणीचा देखील समावेश असून ही आरोपी तरुणी हे गैरकृत्य करण्यासाठी या सात तरुणांना मदत करत होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, कल्याण पूर्व परिसरात एका तरुणीने राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या मुलीने बारावीची परीक्षा दिली होती नुकताच तिचा निकालही आला होता. बारावीच्या परीक्षेत तिला ७१ टक्के गुण मिळाले होते. आत्महत्ये प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी तपास सुरू केला असता तपासा दरम्यान मयत तरुणीच्या मोबाईलमध्ये पोलिसांना सुसाईड नोट आढळली. या सुसाइड नोटच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला.
सदर मयत तरुणीला याच परिसरात राहणारे सात तरुणांनी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर गेल्या दीड वर्षापासून लैंगिक अत्याचार करत असल्याची माहिती समोर आली. या सात विकृत नराधमाना एक तरुणी हे गैरकृत्य करण्यासाठी मदत करत होती.
ही तरुणी पिडीतेची मैत्रीण होती.पोलिसांनी या प्रकणात आठ जणांना अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे. दररम्यान, अटक केलेल्या आरोपींमधील काही कल्याणमधील मोठ्या बिल्डरांची मुले असल्याची माहिती समोर येत आहे.


0 Comments