मेळावे लावा, शाखा पिंजून काढा : उद्धव ठाकरे
शिवसेनेचे बंडखोर आमदार परत येण्याची शक्यता दिसत नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्ष बांधणीला नव्या जोमाने सुरुवात केल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. विभागावर मेळावे लावा, शाखा शाखा पिंजून काढा. आपण हिंदुत्व आणि मराठीच्या मुद्द्यावर आजही कायम आहोत, जे गेलेत त्यांचा विचार करु नका, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत.
शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी सर्व विभागप्रमुखांची बैठक बोलवली होती. त्यावेळी त्यांनी हा आदेश दिला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईतील सर्व विभागप्रमुखांची बैठक पार पडली. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी खालील आदेश दिले. या आदेशामुळे उद्धव ठाकरे अँक्शन मोडवर आल्याचे स्पष्ट झाले आहे.
आपण हिंदुत्व आणि मराठीच्या मुद्द्यांवर आजही काम आहोत. जे गेले त्याचा विचार करू नका. आपल्याला आणखीन ताकदीनं लढायचं आहे. विभागावर मेळावे लावा, शाखा शाखा पिंजून काढा. त्यासाठी आपल्याला सर्व कार्यकर्त्यांना जोर लावून पक्षबांधणीसाठी योगदान द्यावं लागेल. – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
खा. राऊतांना चमत्काराची आशा
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना बंडखोर आमदार परत येतील अशी अजूनही आशा आहे. त्यांनी सोशल मीडियावर बंडखोरांना आवाहन केले आहे.
ते म्हणतात की, “शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी आमदारांची इच्छा असेल तर आमदारांनी 24 तासांत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहून चर्चा करावी. बंडखोर आमदारांच्या मागणीचा विचार होईल. मात्र, त्याआधी तुम्ही मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी असे आवाहन राऊत यांनी दिले. चर्चेतून मार्ग निघू शकतो, चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत. का उगाच वण वण भटकताय? गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ! जय महाराष्ट्र! असं ट्वीट संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांसाठी केले आहे. शेवटच्या क्षणापर्यंत बंडखोर आमदार परत येतील अशी अपेक्षा त्यांना वाटते.
उपसभापती झिरवळ म्हणतात अभ्यास करू द्या!
शिवसेना पक्षाविरोधात बंड केलेल्या 12 आमदारांच्या विरोधात कारवाई करा, सदस्यत्व रद्द करा अशा आशयाचे पत्र शिवसेनेकडून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना देण्यात आलं आहे. पहिल्या टप्प्यात 12 नावं दिली, उरलेल्यांवर पण कारवाईची मागणी करु, असेही त्यांनी सांगितलं आहे. यावर पत्रकारांशी बोलताना उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी अभ्यास करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे म्हटले आहे.
यांच्यावर कारवाईची मागणी
1) एकनाथ शिंदे
2) अब्दुल सत्तार
3) संदीपान भुमरे
4) प्रकाश सुर्वे
5) तानाजी सावंत
6) महेश शिंदे
7) अनिल बाबर
8) यामिनी जाधव
9) संजय शिरसाट
10) भरत गोगावले
11) बालाजी किणीकर
12) लता सोनावणे
दरम्यान, हे सर्व नाट्य सुरू असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार यांनी काँग्रेस आमदारांनाही त्रास दिला. त्यांना पुरेसा निधी दिला नाही, अशी टीका केली आहे.


0 Comments