Breaking News

खाण्यापिण्यासह एकनाथ शिंदेंचा दररोज होतोय इतका खर्च; सात दिवसांसाठी 70 खोल्या बुक

 खाण्यापिण्यासह एकनाथ शिंदेंचा दररोज होतोय इतका खर्च; सात दिवसांसाठी 70 खोल्या बुक

गुवाहटी : शिवसेना नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत 80 % पेक्षा जास्त शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्याने राज्यात कार्यरत असलेले महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्र बाहेर असलेले हे सर्व आमदार आधी सूरत आणि आत्ता गुवाहटीतील अलिशान हॉंटेलमध्ये वास्तव्यास आहेत. बंडखोर आमदारांसह मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीसाठी राहिलेल्या एकूण 55 जणांसाठी तब्बल हॉंटलेच्या 70 खोल्या सात दिवसांसाठी ‘बुक’ झाल्याचे समजते. 


हे बुकींग कोणी केले आहे अद्याप समोर आलेले नसले तरी हा सर्व खटाटोप करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च होत असल्याचे स्पष्ट होत आहे. लोकप्रिया गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ, गुवाहाटी येथून राष्ट्रीय महामार्ग 37 वर सुमारे अर्धा तासाच्या अंतरावर असलेल्या गुवाहाटीमधील सर्वात आलिशान हॉटेल्सपैकी एक ‘रॅडिसन ब्लू’ आहे. गेल्या दोन दिवसांत हे हॉटेल राजकीय केंद्र बनले आहे. त्याला विशेष कारण देखील आहे. या हॉंटेलमध्ये सध्या शिवसेनेचे सुमारे 40 ते 42 बंडखोर आमदार तळ ठोकून आहेत. ज्यांच्या भुमिकेमुळे ठाकरे सरकार धोक्यात आले आहे.


रॅडिसन ब्लू हे हॉंटेल पंचतारांकित आहे. सध्या येथे राहत असलेल्या आमदारांना मिळणा-या सुविधांसाठी लाखो रुपये खर्च होत असल्याचे या हॉंटेलच्या दरावरुन स्पष्ट होत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या हॉटेलच्या 70 खोल्या सात दिवसांसाठी ‘बुक’ करण्यात आल्या आहेत. त्याचे बुकींग कोणी केले हे मात्र समजू शकलेले नाही. शिवसेना आणि अपक्षांसह सुमारे 55 जण या हॉंटेलमध्ये आहेत. सात दिवसांसाठी सुमारे 56 लाख रुपये खर्च असल्याचे म्हटले जात आहे. 


त्याशिवाय खाण्यापिण्यासह इतर खर्च दररोज आठ लाख रुपये आहे. याचा अर्थ सात दिवसांसाठी एक कोटी 12 लाख रुपये येऊ शकतो. यामध्ये चार्टर्ड फ्लाइटचा खर्च, विमानतळ ते हॉटेलपर्यंतचे वाहनाच्या शुल्काची भर पडणार आहे. याव्यतिरिक्त, इतर खर्च आहेत. संबंधित हॉटेलच्या संकेतस्थळावर गेल्यावर या हॉटेलच्या सर्व खोल्या जून अखेर बुक असल्याचे दिसून येत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

Post a Comment

0 Comments