सांगोला नगर परिषद सभागृहात दिसणार महिलाराज आरक्षण सोडत जाहीर ; १२ जागा महिलांसाठी , तर ११ जागा पुरुषांसाठी
सांगोला : सांगोला शहराच्या राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता असलेल्या सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सोमवार , १३ जून रोजी सकाळी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह येथे झाला . यामध्ये १२ जागा महिलांसाठी राखीव , तर ११ जागा पुरुषांसाठी ठेवण्यात आल्या आहेत . यामुळे पालिका सभागृहात महिलाराज येणार असून , भावी नगरसेवकांमध्ये आरक्षणावरून खुशी - गमची प्रतिक्रिया ऐकावयास मिळत आहे . आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे .
त्यानुसार सांगोला नगर परिषदेसाठी ११ प्रभागनिहाय आरक्षण सोडत झाली . आरक्षण सोडतप्रसंगी जिल्हा नियंत्रण पुनर्वसन अधिकारी सोपान टोंपे , तहसीलदार अभिजित पाटील , मुख्याधिकारी कैलास केंद्रे उपस्थित होते . सोडतीमध्ये प्रभाग क्रमांक २ अनुसूचित जाती महिला , प्रभाग क्रमांक ३ अनुसूचित जातीमहिला व प्रभाग क्रमांक ८ अनु . जाती अशा चिठ्ठया काढण्यात आल्या .
यावेळी शिवतेज समीर पाटील ( इ . पहिली ) व शताक्षी चैतन्य कांबळे ( इ . तिसरी ) या विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठया काढून आरक्षण सोडत काढण्यात आली . आरक्षण सोडतीमुळे इच्छुकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत . आता बहुतांश ठिकाणी स्वतः उभे न राहता आपल्या घरातील महिलांना उभे करावे लागणार असल्याचे चित्र तयार झालेले आहे . सांगोला नगर परिषदेमध्ये २३ नगरसेवक असणार आहेत . एकूण १२ जागा महिलांसाठी राखीव करण्यात आलेल्या आहेत . सोडतीनंतर अनेक नगरसेवकांचे पुन्हा नगरसेवक होण्याचे स्वप्नधुळीस मिळणार आहे .
अनेक कार्यकर्त्यांचे मार्ग सुकरही झाले आहेत . सर्वच राजकीय पक्षांनी आम्हालाच अनुकूल वातावरण असल्याचे सांगत नगर पालिकेत आमची सत्ता येणार असल्याचा दावाही केला आहे . आरक्षण सोडतीनंतर अनेकांच्या चेहऱ्यावर दुःख , तर अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटल्याचे चित्र दिसून आले . आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाकडून नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यतानाकारता येत नाही .
त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे . आरक्षण सोडतप्रसंगी सांगोला शहरातील आजी - माजी नगरसेवक उपस्थित होते . आरक्षण सोडतीच्या अनुषंगाने काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या १५ ते २१ जून या कालावधीत दाखल करता येतील . आरक्षणाची अंतिम अधिसूचना १ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले आहे .
चोकट:
प्रभागनिहाय आरक्षण • प्रभाग क्रमांक १ अ सर्वसाधारण महिला , ब सर्वसाधारण • प्रभाग क्रमांक २ अ अनुसूचित जाती महिला , ब- सर्वसाधारण • प्रभाग क्रमांक ३ अ अनुसूचित जाती महिला , ब- सर्वसाधारण ● प्रभाग क्रमांक ४ अ सर्वसाधारण महिला , ब - सर्वसाधारण • प्रभाग क्रमांक ५ अ सर्वसाधारण महिला , ब- सर्वसाधारण • प्रभाग क्रमांक ६ अ सर्वसाधारण महिला , ब- सर्वसाधारण • प्रभाग क्रमांक ७ सर्वसाधारण महिला , ब- सर्वसाधारण - • प्रभाग क्रमांक ८ अ अनुसूचित जाती सर्वसाधारण , ब - सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक ९ अ - सर्वसाधारण महिला , ब - सर्वसाधारण • प्रभाग क्रमांक १० अ सर्वसाधारण महिला , ब- सर्वसाधारण - • प्रभाग क्रमांक ११ अ सर्वसाधारण महिला , ब- सर्वसाधारण महिला , क- सर्वसाधारण .


0 Comments