Breaking News

पंतप्रधान आणि मुख्यमंत्री एकाच मंचावर येणार.

 पंतप्रधान आणि मुख्यमंत्री एकाच मंचावर येणार.

मुंबई: सध्या राज्यात भाजप विरुद्ध शिवसेना या दोन पक्षात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर राज्यसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला. शिवसेनेने महागाईवरुनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली, आता या पार्श्वभूमीवर उद्या सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमधील जल भूषण इमारत आणि राजभवन येथील क्रांतिकारक गॅलरीचं उद्घाटन करणार आहेत, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि पंतप्रधान एकाच मंचावर येणार आहेत.काही दिवसापूर्वी, मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला होता. या कार्यक्रमातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर येणार होते, पण मुख्यमंत्री या कार्यक्रमाला गेले नाहीत.


जल भूषण इमारत ही १८८५ सालापासून महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान आहे. या इमारतीचे आयुर्मान संपल्यामुळे ती पाडण्यात आली होती, आणि त्या जागी नव्या इमारतीच्या बांधकामाची मंजुरी देण्यात आली होती. भारताच्या माननीय राष्ट्रपतींच्याहस्ते ऑगस्ट २०१९ मध्ये नव्या इमारतीची पायाभरणी करण्यात आली होती. जुन्या इमारतीची सर्व वैशिष्ट्ये नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत जतन करण्यात आली आहेत.



सन २०१६ मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांना राज भवनामध्ये एक भुयार सापडले होते. शस्त्रास्त्र ठेवण्यासाठी गुप्त ठिकाण म्हणून पूर्वी ब्रिटीश या भुयाराचा उपयोग करत होते. २०१९ साली या भुयाराचे नुतनीकरण करण्यात आले. या भुयारात बनवण्यात आलेली गॅलरी महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारकांच्या स्मरणार्थ बनवण्यात आलेले अशा स्वरूपाचे एकमेव संग्रहालय आहे. हे संग्रहालय अनेक क्रांतीकारकांना श्रद्धांजली अर्पण करते.


पंतप्रधान मुंबईत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात देखील सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. १ जुलै,१८२२ रोजी फरदुनजी मर्झबानजी यांच्या हस्ते मुंबई समाचारची एक साप्ताहिक म्हणून छपाई सुरु झाली. त्यानंतर १८३२ साली ते दैनिक झाले. हे वृत्तपत्र गेली २०० वर्ष सातत्त्याने प्रकाशित होत आहे. या दुर्मिळ विक्रमाचे स्मरण म्हणून या प्रसंगी एक टपाल तिकीट देखील प्रकाशित केले जाणार आहे.

Post a Comment

0 Comments