कचरा डेपोवर जुन्या साठलेल्या कचऱ्यापासून खत निर्मिती सांगोला नगरपरिषदेचा स्तुत्य उपक्रम !
सांगोला (प्रतिनिधी) :कचरा डेपो वर वर्षानुवर्षे साठलेल्या जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून खतनिर्मिती करण्याच्या कामाची सुरुवात सांगोला नगरपरिषदेकडून झाली असून सदर काम लवकरच पूर्ण होऊन यातून कचऱ्यापासून दुर्गंधी, कचऱ्यास आग लागून त्यातून निर्माण होणारा धूर या समस्या कायमच्या संपणार असल्याची माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.
सांगोला नगरपरिषदेमार्फत दररोज घंटागाडी द्वारे घरे, व्यापारी आस्थापना यांच्या पासून निर्माण होणारा वर्गीकृत कचरा संकलित करून तो कडलास रोड येथील कचरा डेपोवर पाठविला जातो. याठिकाणी ओल्या कचऱ्यावर बायो कलचर पावडर द्वारे खत निर्मिती केली जाते व सुक्या कचऱ्यास विविध घटकात वर्गीकृत करून ते पुढे पुनर्वापरा करिता पाठविले जाते. अजरोजी निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया होत असली तरी काही वर्षांपूर्वी अश्या प्रक्रिया राज्यभरातील नगरपरिषदांमध्ये होत नसल्याने वर्षानुवर्षे साठलेल्या कचऱ्याचे ढीग ही सर्वच नगरपरिषदांना भेडसावणारी एक समस्या आहे.
नगरपरिषदेने हाती घेतलेल्या या उपक्रमातून वर्षानुवर्षे साठलेल्या कचऱ्यापासून खत निर्मिती होऊन कचऱ्याच्या ढिगांमुळे अडकून पडलेली मोठी जमीन वापरात येणार असून येत्या काळात कचरा डेपोस भिंतीचे कुंपण करून एक सुंदर अश्या पिकनिक स्पॉट मध्ये या जागेस रूपांतरित करण्याचा मानस आहे.
कैलास केंद्रे, मुख्याधिकारी, सांगोला नगरपरिषद
सांगोला नगरपरिषदेने या अनेक वर्षांपासून साठलेल्या जुन्या कचऱ्यावर ‘बायोमायनिंग’ ही प्रक्रिया करून त्यापासून खत निर्मितीस सुरुवात केली आहे. या प्रक्रियेत कचऱ्यातील दगड, काच, प्लास्टिक इत्यादी घटक वेगळे करून खत निर्मिती केली जात आहे. यामुळे कचरा डेपो वरील जुन्या साठलेल्या कचऱ्याचे ढीग, त्याची दुर्गंधी, त्यातून अधून मधून निघणारा धूर हे सर्व चित्र इतिहास जमा होणार असून भरपूर मोठी जागा रिकामी होणार आहे. सदरचे काम अंतिम टप्प्यात असून साधारणपणे पुढील १० दिवसात ते पूर्ण होईल अशी माहिती मुख्याधिकरी श्री. कैलास केंद्रे यांनी दिली.


0 Comments