ऊसाला आग लाऊन वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या !
अहमदनगर : ऊसाला तोड मिळत नसल्याने वैतागून एका वृद्ध शेतकऱ्याने आपल्या तीन एकर ऊसाला आपल्या हाताने आग लावली आणि त्यानंतर विष प्रश्न करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील जोहरापूर येथे घडली आहे.
राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला असून एप्रिल महिना सुरु झाला तरी शिवारात अद्याप ऊस शिल्लक आहे. कराराप्रमाणे काम सामावून ऊसाची तोडणी करणारे मजूर आपल्या गावी परतले आहेत. उर्वरित तोडणी मजुरावर उसाची तोड सुरु आहे त्यामुळे तोडणीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला असताना मजुरांनी शेतकऱ्यास वेठीस धरणे सुरु केले आहे. जादा मजुरीसह अनेक प्रकारच्या मागण्या हे मजूर करू लागले आहेत. त्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर उसाची तोड केली जात नाही आणि कारखानेही आपली असमर्थता व्यक्त करीत आहेत त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी यावर्षी या वेगळ्याच संकटात सापडला आहे. आणि त्याच त्रासातून ७० वर्षाचे वय असलेल्या जनार्धन सीताराम माने या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे.
शेवगाव तालुक्यातील जोहरापूर येथील वयोवृद्ध शेतकरी जनार्धन माने यांचा पावणे तीन एकर ऊस रानात तसाच उभा होता. या उसाची तोड व्हावी म्हणून रोज ते प्रयत्न करीत होते पण त्यांना तोड मिळत नव्हती. वाढत्या उन्हाची तीव्रता आणि उसाला तुरे आलेले होते. कालावधी संपला तरी ऊसाची तोड होत नव्हती त्यामुळे ते निराश झाले होते. साखर कारखान्यांना ते विनंती करीत होते पण प्रत्येकवेळी त्यांना पुढचीच तारीख मिळत होती. प्रत्यक्षात तोड मात्र मिळतच नव्हती. हेलपाटे घालून आणि विनंत्या करून थकलेल्या या शेतकऱ्याने अखेर टोकाचे पाऊल उचलले आणि आपले आयुष संपविले.
ऊसाला तोड मिळत नाही यामुळे निराश झालेले आणि खचलेले ७० वर्षे वयाचे शेतकरी जनार्धन माजे यांनी अखेर आपल्या हाताने आपला उस पेटवून दिला. ऊसाला आग लावल्यानंतर उसाच्या फडातच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली असून अतिरिक्त उसाचा प्रश्न किती गंभीर होत चालला आहे हेच अधोरेखित झाले. या घटनेने शेतकऱ्यात संताप असून साखर कारखान्याच्या बाबतीत प्रचंड रोषाचे वातावरण तयार झाले आहे. उसाची तोड लांबू लागल्याने या शेतकऱ्याने हे पाउल उचलले असल्याचे मयत शेतकरी जनार्धन माने यांचा मुलगा संतोष यांनी दिलेल्या पोलीस जबाबात म्हटले आहे.


0 Comments