सरकारला जनतेच्या हिताचे काम करू न देण्याचा उद्योग सुरू आहे – ना. भुजबळ
जनतेच्या हितासाठी काम करणाऱ्या या सरकारला कामच करू द्यायचे नाही असा उद्योग नाव न घेता भाजपाने चालवला आहे असा टोला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला आहे.
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार समाजातील सर्व घटकांसाठी अतिशय चांगले काम करत आहे.मात्र जनतेच्या हितासाठी काम करणाऱ्या या सरकारला कामच करू द्यायचे नाही असा उद्योग नाव न घेता भाजपाने चालवला आहे असा टोला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला आहे.महूद येथे झालेल्या शेतकरी परिषदेमध्ये ते बोलत होते.या शेतकरी परिषदेमध्ये डाळिंब उत्पादकांच्या प्रश्नावर विचारमंथन करण्यात आले.
महूद येथील ग्रामस्थांनी आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून येथील कासाळ ओढ्याचे पुनरुज्जीवन केले आहे. ग्रामस्थांच्या या कामामुळे महूदला राष्ट्रीय जल पुरस्कार मिळाला आहे.
महूदकरांनी जलक्रांती च्या कामांमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी महूदकरांचे कौतुक केले.येथील तरुणांनी चांगले काम हाती घेतले,त्याला समाजातील सर्व घटकांनी सहकार्य केल्याने एक आदर्शवत काम उभारले आहे असेही ते म्हणाले.एका बाजूला जलक्रांती मध्ये मोठे योगदान देणाऱ्या या भागातील डाळिंब पंढरी हवामानातील बदल व रोग किडीमुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
डाळिंब उत्पादन तीन हजार कोटी रुपयांवरून यंदा 800 कोटी पर्यंत कमी झाले आहे.या संकट काळात राज्य सरकार डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसोबत आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण व त्यावरील उपाय देशात फक्त माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडे आहेत.याबाबत त्यांच्याशी चर्चा करून निश्चितपणे उपाय शोधले जातील.
यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षण व देशातील कायद्याचा दुरुपयोग यावर तुफान फटकेबाजी केली.राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने कोरोना महामारी संकटात जनतेसाठी मोठे काम केले आहे.
औषधोपचा बरोबरच कामगार,कष्टकरी,शेतकरी यांना आधार दिला आहे. मात्र राज्य सरकारच्या चांगल्या कामावर चर्चा होऊ नये यासाठी धाड, अटक यावर सातत्याने चर्चा केली जात आहे.राज्यात काम नसलेल्या या लोकांनी सरकारला कामच करू द्यायचे नाहीत असा चंग बांधलेला आहे.त्यासाठी यंत्रणांचा दुरुपयोग करून सरकार मधले सगळे भ्रष्टाचारी व तिकडे असणारे सगळे शिष्टाचारी आहेत.
शिवाय त्यांच्या गोटात सामील झाला की तो पवित्र आहे,असे भासवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. आपल्या पन्नास वर्षांच्या राजकीय जीवनात अशी परिस्थिती कधीही पाहिली नव्हती.छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात यापूर्वी असे कधीही घडले नाही.देशातील बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, कष्टकऱ्यांचे प्रश्न यावर दिल्लीश्वर कधीही बोलत नाहीत.अशी संकटेेेेे येतील पण ती कायम राहत नसतात असेही ते म्हणाले.
ओबीसी आरक्षण बाबत बोलताना मंत्री भुजबळ यांनी सांगितले की हे राजकीय आरक्षण टिकविण्यासाठी आवश्यक असणारा डाटा केंद्र सरकारने वेळेत सादर केला असता तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती. ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रासह इतर अनेक राज्यांमध्ये यामुळे निर्माण झाला आहे. मुळात दिल्ली सरकारला ओबीसींचे राजकीय आरक्षण नष्ट करावयाचे आहे.या आडून बाकीची इतर आरक्षणे ही संपवण्याचा घाट घातला जात आहे.त्यासाठी न्यायालयाच्या माध्यमातून ही अडचणी निर्माण केल्या जात आहेत.मात्र आम्ही असे घडू देणार नाही.
यावेळी बोलताना आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह म्हणाले की,येथील जनतेने जलक्रांती मध्ये दिलेले योगदान पुरस्कारापेक्षा मोठे आहे.या भागातील डाळिंब वाचविण्यात यावे. या
शेतकरी परिषदेमध्ये आमदार शहाजी पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील,शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख, अभिनेता व महूद ग्रामविकासाचे ब्रँड ॲम्बेसिडर चिन्मय उदगीरकर,म्हसवडच्या माजी नगराध्यक्षा कविता म्हेत्रे, डाळिंब उत्पादक महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांनीही विचार व्यक्त केले.
कार्यक्रमास महात्मा फुले समता परिषदेचे बापूसाहेब भुजबळ, बाबुराव गायकवाड,सरपंच संजीवनी लुबाळ,डॉ. नानासाहेब माळी, बाळासाहेब काटकर,के.एस.माळी, डॉ. प्रभाकर माळी,नारायण काटकर,चंद्रशेखर ताटे, डॉ. विलास खांडेकर,यशवंत खबाले,विठ्ठल बागल,महेंद्र बाजारे,कैलास खबाले, शंकर मेटकरी यांच्यासह अधिकारी,समता परिषदेचे कार्यकर्ते व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक महेंद्र महाजन यांनी तर सूत्रसंचालन दादा खांडेकर यांनी केले.



0 Comments