पगारात होणार बदल, सुट्ट्याही वाढणार, नव्या कामगार कायद्यामुळे नोकरदारांना ‘अच्छे दिन’..!
देशातील नोकरदार वर्गासाठी एक आनंदाची बातमी आहे.. मोदी सरकार यावर्षी नवा कामगार कायदा घेऊन येत आहे. या नवीन कामगार कायद्यात मोठ्या प्रमाणात बदल केले जाणार आहेत.. त्यामुळे नोकरदार वर्गाला खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिन’ येणार असल्याचे बोलले जाते..
मोदी सरकार गेल्या वर्षभरापासून नवीन कामगार कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या तयारीत आहे. मात्र, राज्य सरकार मसुदा तयार करीत असल्याने आतापर्यंत या कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही. मात्र, यावर्षी हा कायदा लागू होणार असल्याची अपेक्षा आहे.
राज्याच्या मसुद्यांवर सध्या चर्चा केली जात आहे. नवीन कामगार कायद्यात काही महत्वाचे बदल केले जाणार आहेत. कामगार मंत्रालय वेतन संहितेबाबत सर्व क्षेत्रातील ‘एचआर’ प्रमुखांशी चर्चा करीत असल्याचेही सांगण्यात आले.. हा कायदा लागू झाल्यास नोकरदार वर्गाचा काय फायदा होणार, याबाबत जाणून घेऊ या..
कायदा लागू झाल्यास…
पगारी रजा वाढणार : संसदेने 2019 मध्येच नवीन कामगार संहिता मंजूर केलीय. कामगार संहितेच्या नियमांत बदल करण्याबाबत कामगार मंत्रालय, कामगार संघटना व उद्योगांच्या प्रतिनिधींमध्ये अनेक तरतुदींवर चर्चा झालीय. नव्या नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा (पगारी रजा) 240 वरून 300 पर्यंत वाढवल्या जाऊ शकतात.
पगार कमी होणार : नवीन वेतन संहितेनुसार कर्मचाऱ्यांच्या पगार रचनेत मोठा बदल होणार आहे. कर्मचाऱ्यांचा ‘टेक होम’ पगार कमी होऊ शकतो. नव्या कायद्यानुसार, कर्मचाऱ्याचा मूळ पगार कंपनीच्या ‘सीटीसी’ खर्चाच्या 50 टक्क्यांपेक्षा कमी असू शकत नाही. सध्या अनेक कंपन्या मूळ पगार कमी करतात व जास्त भत्ते देतात. त्यामुळे कंपनीवरचा आर्थिक बोजा कमी होतो.
नवीन वेतन संहितेनुसार, कर्मचाऱ्यांचे भत्ते कोणत्याही परिस्थितीत एकूण पगाराच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाहीत. समजा, एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार 50 हजार रुपये महिना असेल, तर त्याचा मूळ पगार 25000 रुपये व उर्वरित 25000 रुपये भत्त्यांमध्ये असावेत..
आठवड्याला 48 तास काम : कामगार व रोजगार मंत्रालयाच्या माहितीनुसार, प्रस्तावित कामगार संहितेत आठवड्यात 48 तास कामाचा नियम लागू होईल. काही संघटनांनी 12 तास काम आणि 3 दिवसांच्या सुट्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावर सरकारने स्पष्टीकरण दिले होते, की आठवड्यात 48 तास काम करावे लागेल. एखादा कर्मचारी रोज 8 तास काम करीत असेल, तर त्याला आठवड्यातून 6 दिवस काम व एक दिवस सुट्टी मिळेल.
सामाजिक सुरक्षा : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा कल्याण प्रणालीवरही काम केलं जात आहे. कार्यालयात काम करणाऱ्या नोकरदार, गिरण्या व कारखान्यांमधील कामगारांवरही या कायद्याचा परिणाम होणार असल्याचे सांगण्यात आलं..
0 Comments