महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शांततेत व उत्साहात साजरी करावी: पो.नि.अनंत कुलकर्णी
सांगोला (प्रतिनिधी) : आगामी काळातील येणारे सण-उत्सव व जयंती साजरी करीत असताना समोरच्याच्या भावना दुखावणार नाहीत. सण- उत्सव व शांततेला कोणत्याही प्रकारे गालबोट लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. प्रशासनाला सहकार्य करावे असे सांगत, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शांततेत व उत्साहात साजरी करावी. असे आवाहन पोलीस निरीक्षक आनंत कुलकर्णी यांनी केले.
कोरोना प्रादुर्भावाच्या मागील दोन वर्षाच्या कालावधीनंतर सण उत्सव व जयंती साजरी करण्यासाठी शासनाने निर्बंध हटवले आहेत. त्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे १४ एप्रिल रोजी सांगोला शहर आणि तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी होत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने, जयंती उत्सव शांततेत पार पडावा म्हणून काल शनिवार दिनांक ९ एप्रिल रोजी तालुक्यातील सर्व गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष – सदस्य तसेच शांतता कमिटी सदस्य पत्रकार बांधव यांच्यासमवेत पंचायत समिती बचत भवन येथे पूर्व नियोजित बैठक पार पडली. यावेळी उपस्थितांना आवाहन करताना पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी बोलत होते.
या बैठकीमध्ये ज्येष्ठ नेते बाबुरावभाऊ गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील, आरपीआयचे जिल्हा सरचिटणीस सुरजदादा बनसोडे, काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे नेते रवींद्र कांबळे, बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे, बाळासाहेब बनसोडे, विजय बनसोडे आदींनी मनोगत पर विचार व्यक्त केले.
यावेळी पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी म्हणाले, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असताना कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची सर्वांनी खबरदारी घ्यावी. शांतता सलोखा राखून मोठ्या उत्साहाने सर्वांनी एकत्रित येऊन जयंती साजरी करावी. जयंती साजरी करत असताना सामाजिक बांधिलकी जपत जयंती उत्सव साजरा करावा. यामध्ये प्रामुख्याने पारंपारिक वाद्याला प्राधान्य द्यावे असे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी सांगितले.



0 Comments