मुलीबाबत वाईट कृत्य करेल या भिती पोटी, पत्नी व मुलीच्या मदतीने केला मजुराचा खून…..
मुलीबाबत वाईट कृत्य करेल या भीतीतून पत्नी व मुलीच्या मदतीनं एका इसमानं मजुराचा खून करून तो अपघात असल्याचं भासविले.
दरम्यान ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी १२ वाजेच्या सुमारास नंदुरबार-निझर रोडच्या लगत पपईच्या शेताजवळ ३५ वर्षे वय असलेल्या एका इसमाचा मृतदेह आढळून आला होता. त्याचे डोके, पाय व पाठीमागील बाजूस मार लागल्याच्या खुणा होत्या. तो मृतदेह मनोहर व्यंकट पाटील यांचे खडी क्रशरवर काम करणारा जामसिंग सुरसिंग ठाकरे याचा असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी सुरुवातीला उपनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र घटनास्थळी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी घटनास्थळास भेट दिली असता सदर इसमाचा मृत्यू अपघातातून नव्हे तर त्याचा खून झाल्याचा संशय आला. यामुळे पोलीस निरीक्षक यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळास पुन्हा भेट देऊन पाहणी केली. यावेळी खडी क्रेशरवर काम करणाऱ्या इतर मजुरांना विचारपूस केली. मयतास दारू पिण्याची सवय असल्याने दारू घेण्यासाठी गेला असताना वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याचा अंदाज प्रत्येकाकडून व्यक्त करण्यात आला. तपासादरम्यान मनोहर पाटील यांचे शेतातील गोठ्यावर राखणदार म्हणून काम करणारा व्यक्ती हा पोलिसांना टाळत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने तो राहत असलेल्या गोठ्याच्या परिसराची पहाणी केली. पाहणीदरम्यान गोठ्याच्या मागील बाजूस रक्ताचे काही डाग दिसून आले. त्यामुळे त्या व्यक्ती वरील संशय अधिक वाढला.
त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली. मयत व्यक्ती ही गोठ्यावर येऊन मुलीकडे वाईट नजरेने बघत असल्याच्या संशय होता. रात्री मयत व्यक्ती ही उशिरा दारू पिऊन खेमा काम करीत असलेल्या गोठ्याकडे आला होता. त्यावेळी खेमा जागाच असल्याने त्याने त्यास पाहिले व तो आपल्या मुलीबाबतीत काहीतरी वाईट कृत्य करेल असा त्यास संशय आल्याने त्याने पत्नी व मुलीसह जामसिंगला लाकडी दांडक्याने डोक्यावर तीन चार वेळा मारले. त्यात तो खाली पडला त्यानंतर त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. हे लक्षात आल्यामुळे खेमाची पत्नी व मुलगी घाबरली.
जामसिंग याच्या मृत्यूचे कारण कोणालाही कळू नये. त्याचा मृत्यू एक अपघात वाटावा असे त्यांनी ठरविले. खेमाने त्याचे पत्नी व मुलीसह मयत जामसिंग याचे पायास दोराने बांधून त्यास घरापासून जवळच असलेल्या नंदुरबार-निझर रोडच्या लगत पपईच्या शेताच्या बांधावर फेकून दिले आणि त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव केला. परंतु नंदुरबार पोलीस अधीक्षक यांनी नोंदविलेल्या तपासातून खरा प्रकार समोर आला.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, आणि यांचे पथकांने केली…

0 Comments