' तो ' बापलेकांवर तासाभर चाकूने वार करत होता
, लोक फक्त बघत होते , मुंबईतील घटना
मुंबई पोलिसांची 'स्कॉटलॅंड पोलिसां'शी तुलना केली जाते,पण आज मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असताना भर रस्त्यावर रक्ताचा सडा पडला आहे. जे जे मार्ग पोलीस स्टेशनच्या परिसरात क्षुल्लक कारणावरून एका गुंडाने बाप आणि मुलावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात बापाचा मृत्यू झाला आहे. तर मुलावर उपचार सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जे जे मार्ग पोलीस स्टेशनपासून काही अंतरावरच सकाळी 8.45 च्या सुमारास मटका गल्ली कॉर्नरजवळ, शाफी मस्जिद समोर, नळबाजार इथं ही घटना घडली. या ठिकाणी बाबूजी कुरेशी (वय 50) ते आणि त्यांचा मुलगा छोटू कुरेशी (वय अंदाजे 30) या दोघांना सोहराब कुरेशी, वय (30) या तरुणाने फळ विक्रीच्या पैशांच्या देवाण-घेवाण या कारणावरून चाकूने वार करून जखमी केलेसोहराब याने बाबूजी कुरेशी यांच्याकडून 35 हजार रुपयांची फळे विकत घेतली होती.
पण पैसे देत नसल्याने बाबूजी कुरेशी याने सोहराबकडे पैशांचा तगादा लावला होता. वारंवार पैशांची मागणी करतात म्हणून सोहराब आणि बाबूजी यांच्यात वाद सुरू झाला. ज्याचे रुपांतर काही वेळाने हाणामारीत झाले. बघता बघता हाणामारी इतकी टोकाला गेली की, सोहराबने पैशांच्या देवाणघेवाणीवरुन बाबूजी आणि त्यांचा मुलगा छोटू या दोघांवर धारधार शस्त्रांनी वार केले.
दोघांनीही आपला बचाव केला पण यात ते दोघेही गंभीर जखमी झाले.या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून रक्तबंबाळ झालेले दोघे बाप बेटे हल्लेखोर गुंड सोहराब नावाच्या तरुणाला प्रतिकार करत असल्याचे व्हायरल व्हिडिओमधून स्पष्ट दिसत आहे. सोहराब या गुंडाने बाबूजी आणि छोटू यांना रक्तबंबाळ केले होते. बाबूजी यांच्या मानेवर, पोटावर, गळ्यावर सर्वत्र सोहराबने चाकूने वार केले होते.
धक्कादायक म्हणजे, हा रंक्तरंजीत खेळ बराच वेळ सुरू होता. हल्लेखोर गुंड मारुन मारुन इतका थकला होता की, त्याला हलता येत नव्हते तर ते दोन्ही तरुण इतके रक्तबंबाळ झाले होते की, त्यांना हालचाल करता येत नव्हती. बराच वेळ तिघही एकाच ठिकाणी उभे होते.. बघ्यांची गर्दी वाढत होती कोणी तरी पोलिसांना फोन करा रे असा आवाज गर्दीतून येत होता तर एक तरुण पुढेही गेला मदत करायला पण बघ्यांनी त्याला ही बाजूला केले.
एवढंच काय तर “जो कोणी यांना हॉस्पिटलमध्ये भरती करेल त्यांना देखील सोडणार नाही” अशी धमकीच गुंड सोहराब देत होता. त्यामुळे गर्दीतून कुणीच पुढे येत नव्हतं. आश्चर्यकारक आणि संतापजनक म्हणजे, हा रक्तरंजित खेळ जे जे मार्ग पोलीस स्टेशनपासून काही अंतरावरच सुरू होता पण पोलिसांना घटनेची माहिती कळाली देखील नाही.
धक्कादायक म्हणजे, सकाळी पावणे नऊ वाजता घडलेली घटना जे जे मार्ग पोलिसांना एक तासाने म्हणजे 9 वाजून 40 मिनिटांनी कळाली. तोपर्यंत हा खुनी खेळ सुरुच होता. जवळपास १ तासापर्यंत आरोपी सोहराब दोघां बाप बेट्यावर हल्ले करुन तो पसार देखील झाला आणि त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर मुंबई क्राईम ब्रांचच्या युनिट 11 ने आरोपी सोहराब याला कांदिवली परीसरातून पकडले. सोहराब देखील बाबूजी आणि छोटूच्या प्रतिकारात जखमी झाला होता.
त्याला पोलिसांनी अटक करुन कांदिवली येथीलच एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. सोहराबने केलेल्या हल्ल्यात बाबूजी कुरेशी यांचा मृत्यू झाला आहे. कारण बराचवेळ त्यांच्या शरीरातून रक्त जास्त प्रमाणात वाहून गेलं होतं. तर छोटू कुरेशी वर जे जे हॉस्पिटलमध्येच उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

0 Comments