सोलापूर : बँक डिपॉझीटच्या कमिशनवर डल्ला कोण मारतंय?
‘NHM’मध्ये पगार का अडविला जातोय, झेडपीतील कळीच्या नारदाचा व्हावा शोध
साेलापूर: आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार जाणीवपूर्वक अडवून बँकेतील डिपॉझीटचे कमिशन कोण खातयं याची आता जिल्हा परिषदेत खुमासदार चर्चा रंगली आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत एनआरएचएमसाठी केंद्र व राज्य शासनाकडून मोठा निधी उपलब्ध होतो. राष्ट्रीय लसीकरण व इतर आरोग्याच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आशावर्कर नियुक्त आहेत. त्याचबरोबर कोरोना काळात कंत्राटी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली.
या सर्व गोष्टींसाठी एनआरएचएमसाठी वर्षाकाठी सुमारे ८० कोटीचा निधी येतो. हा निधी कोणत्या बँकेत ठेवला जातो. निधीचा वापर वेळेत व योजना मार्गी लावण्यााठी केले जाते का याचा शोध घेतल्यावर धक्कादायक माहिती समोर येत आहे. गेल्या वर्षभरात आशा वर्कर व कंत्राटी डॉक्टरांना वेळेवर मानधन अदा केले गेले नाही. कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेले प्रवासभत्ते व इतर योजना राबविण्याताबाबत चालढकल केली जात आहे.
यामागे धक्कादायक कारण समोर येत आहे. बँकेत दीर्घकाळ पैसे डिपॉझीट राहिल्यावर संबंधित अधिकाऱ्यांना कमिशन मिळत असल्याची चर्चा आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. एनआरएचएमच्या पैशाच्या जोरावर बँकेत पदोन्नती कोणाला मिळाली याचे शोध घेण्याचे मोठे आव्हान सीईओ दिलीप स्वामी यांच्यासमोर असल्याचे आता बोलले जात आहे.
■ मनपाचे ८ कोटी गेले
कोरोना काळात महापालिकेच्या आरोग्य विभागाने मोठे काम केले. या बदल्यात अनेक गोष्टींसाठी पैसा हवा होता. शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी आलाही. पण कर्मचाऱ्यांनी वेळेवर फायली न फिरविल्यामुळे ८ कोटीचा निधी परत गेला अशी तक्रार महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी केल्यावर ही भानगड उघड झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच सिव्हील हॉस्पीटकले नेमलेल्या कंत्राटी डॉक्टरांचे ४३ लाख मानधन थकीत आहे. आशा वर्कर, योजना व डॉक्टरांचे मानधन असे सुमारे दोन कोटी रुपये कोठून द्यायचे असा प्रशासनासमोर प्रश्न पडला आहे.

0 Comments