google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापुरातील २७ पोलिसांची वाहने केली जप्त !

Breaking News

सोलापुरातील २७ पोलिसांची वाहने केली जप्त !

 सोलापुरातील २७ पोलिसांची वाहने केली जप्त !

सोलापूर : सामान्य नागरिकांना रस्त्यावर अडवून त्यांच्याकडून दंडाची वसुली केली जाते पण सोलापुरात तब्बल २७ पोलिसांवरच कारवाई करण्यात आली असून त्यांची वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.


सामान्य नागरिक रस्त्यावरून वाहन घेऊन निघाला की त्याला वेगवेगळे नियम दाखवून पोलीस दंड करतात. पोलीस मात्र नियमांचे पालन करीत नसताना त्यांना मात्र दंड होत नाही अशी तक्रार नागरिकांची नेहमी असते. अनेकदा पोलीस दुचाकीवरून तिघेजण बसून जातात तर सर्रास हेल्मेटचा वापर न करताच पोलिसांच्या दुचाकी धावत असतात. 


सर्वसामान्य माणसाला मात्र लगेच कायद्याची शिकवण आणि दंडाची आकारणी केली जाते. पोलिसांना वेगळा कायदा आहे काय ? अशी विचारणा देखील काही संतापलेले नागरिक करीत असतात  पण कायदा सर्वाना सारखाच आहे हेच सोलापूर पोलिसांनी दाखवून दिले आहे. 


वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या २७ पोलिसांच्या विरोधात कारवाई करण्यात आली असून १३ हजार ५०० रुपये दंड देखील वसूल करण्यात आला आहे. सोलापूर शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली तेंव्हापासून नागरिक संतापलेले आहेत. अनेकांना दंडाच्या पावत्या घेऊन घरी यावे लागले आहे. 


पण आता पोलिसांना देखील तोच नियम लावल्याने पोलिसांकडे बोट दाखवणे आपोआप थांबणार आहे.  सामान्य नागरिकांच्या प्रमाणे पोलिसांनी देखील नियम पाळले पाहिजेत यासाठी वाहतूक पोलिसांनी पोलिसांवरच कारवाई करणे सुरु केले आहे. त्यानुसार पहिल्या दिवशी १७ पोलिसांवर कारवाई करण्यात आली तर दुसऱ्या दिवशीही ती सुरूच ठेवण्यात आली. 


शहरातील विविध रस्त्यावरून हेल्मेट न वापरता वाहन चालविणाऱ्या पोलिसांना रोखून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्तालयाजवळ देखील विना हेल्मेट पोलिसांना थांबवून  त्यांचावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.  वाहतूक शाखेचे क्रेन बोलावून पोलिसांची वाहने देखील जप्त करण्यात आली.


 सोलापूर पोलीस पुढील काळात सोलापुरात हेल्मेट सक्ती करणार आहेत, त्याआधीच पोलिसांवर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकाराने पोलिसात खळबळ उडालीच आहे पण नागरिक देखील मोठ्या कुतूहलाने या कारवाईकडे पाहत आहेत.

Post a Comment

0 Comments