तृथीयपंथीय समाजही मानानं जगणार! सोलापुरात पोलिसांनी सुरू केलाय 'हा' अनोखा उपक्रम
सोलापूर : तृथीयपंथीय हा समाजाकडून दुर्दैवानं दुर्लक्षित असलेला भाग. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी म्हणावे तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. मात्र काही ठिकाणी असे प्रयत्न होत असतात. त्यामुळे तृथीयपंथीयांना सन्मानाची वागणूकही मिळते आणि पैसे कमावण्याचं साधनही उपलब्ध होतं. सोलापुरात असा उपक्रम राबविण्यात आलाय. पोलिसांनी या उपक्रमात पुढाकार घेतलाय. पोलीस म्हटलं, की अनेकांच्या मनात धडकी भरते तर अनेकजण त्यांच्यापासून लांब राहणेच पसंद करतात.
मात्र तृतीयपंथीयाना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सोलापूर पोलिसांनी अनोखा उपक्रम राबविलाय. सोलापूरचे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या संकल्पनेतून तीन तृतीयपंथीयांना नोकरी देण्यात आली आहे. हा उपक्रम तृथीयपंथीय समाजास मानानं जगण्यास उपयोगी ठरणार आहे. याचं सर्व स्तरातून स्वागत होतंय.स्वागत आणि सत्कार समारंभ
सोलापूर पोलीस आयुक्तालयातर्फे चालवल्या जाणाऱ्या पेट्रोल पंपावर 2 तृतीयपंथीयांना नोझल ऑपरेटर म्हणून तर सहायक पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयात काम करण्यासाठी एका तृतीयपंथीय बांधवाला संधी देण्यात आलीय. आज या तृतीयपंथीय बांधवांचा स्वागत आणि सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
तृतीयपंथीय समाजासाठी पोलिसांचा उपक्रम
समाजाकडून हेटाळणीची वागणूक
साधारणत: तृतीयपंथीय हे भिक्षा मागून जीवन जगत असतात. अशावेळी अनेकदा त्यांना हेटाळणीची वागणूक मिळते. अनेक तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात यायचं असतं. मात्र त्यांना संधी दिली जात नाही. त्यामुळे स्वत:पासून सुरुवात करत आम्ही चालवत असलेल्या पेट्रोल पंपावर त्यांना नोकरी दिली आहे. पेट्रोल पंपावर रोज हजारो लोक येत असतात. तृतीयपंथीय बांधवाना पाहून हे देखील समाजाचा भाग आहेत. त्यांनादेखील संधी द्यायला हवी, अशी भावना सर्वसामान्य नागरिकांत निर्माण होईल, अशी अपेक्षा यावेळी पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी व्यक्त केली.
कष्टाने पैसे कमावल्यानंतरचे समाधान
रस्त्यावर भिक्षा मागताना जरी पैसे जास्त मिळत असले, तरी त्यात सन्मान नव्हता. स्वत:च्या कष्टाने पैसे कमावल्यानंतरचे समाधान वेगळे असते, अशी प्रतिक्रिया नोझल ऑपरेटर म्हणून रुजू झालेल्या प्रदीप पाटील यांनी दिली.

0 Comments