३३ कोटी वृक्षलागवड योजनेवर ,वन अधिकाऱ्यांनीच मारला डल्ला !
पंढरपूर तालुक्यातील वन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
पर्यावरण समृद्ध व्हावे यासाठी भाजप सरकारच्या काळात तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आणलेली , ३३ कोटी आणि १३ कोटी वृक्ष लागवड योजना घाट्यात निघाली आहे . वृक्ष लागवड न करताच बोगस बिले काढून अधिकाऱ्यांनीच या योजनेवर डल्ला मारल्याचे चित्र सोलापूर जिल्ह्यात दिसत आहे . या जिल्ह्यात कोट्यावधी रुपयांची बोगस बिले काढून अधिकाऱ्यांनी स्वतः चाच गल्ला भरून घेतल्याचे दिसून येत आहे .
राज्याचे तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ही योजना पुढे आली होती . या योजनेचा पुरता फज्जा उडवण्याचे काम वन विभागातील अधिकाऱ्यांनीच केले आहे . आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना कामगार म्हणून घोषित केले आणि त्यांच्याच नावे चेक काढले आहेत . ही रक्कम पुन्हा स्वतःच्या खात्यावर घेण्याचे काम वन विभागातील अधिकाऱ्यांनी केले आहे . पंढरपूर तालुक्यातील वनविभागात झालेल्या या घोटाळ्याबाबत , येथील फौजदारी न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे .
एका सामाजिक कार्यकर्त्यांने हा दावा दाखल केला असून , वनरक्षक संतोष महालिंग नवघरे , वनक्षेत्रपाल किशोर सुभाष आहिरे , तसेच वनमजूर आंबंन्ना सिद्राम जेउरे इत्यादींसह इतर पाच अधिकाऱ्यांविरोधातओझेवाडी , आंबे गुन्हा दाखल करण्यात यावा , अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे . या प्रकरणी पंढरपूर तालुक्यातील येथील नागरिकांच्या नावे बोगस रकमा काढण्यात आल्या असल्याची तक्रार करण्यात आली आहे .
यातील काही नागरिक कॉलेजचे विद्यार्थीही आहेत . नोकरी लावतो असे आमिष दाखवून तसेच वन विभागातील मजुरांच्या नातेवाईकांना यात गुंतवले असल्याची माहिती अँड . नायकू यांनी याप्रकरणी दिली आहे . पंढरपूर , मंगळवेढा , सांगोला , माळशिरस तसेच सोलापूर जिल्ह्यातील इतर ठिकाणीही सामाजिक वनीकरण विभागाने हा १०० कोटींहून अधिकचा घोटाळा केला असल्याचे उघड होत आहे.
ज्यांच्या नावे रकमा काढण्यात आल्या त्यातील अनेक नागरिकांनी प्रशासनाकडे तसेच , वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारीही दाखल केलेल्या आहेत . यामुळे या घोटाळ्या संदर्भात वरिष्ठ स्तरावरून चौकशीचे आदेश झाल्यास ३३ कोटी आणि १३ कोटी वृक्ष लागवड योजनेत झालेल्या घोटाळ्यांची सीमा लक्षात येणार आहे.

0 Comments