सोलापूर : डोक्यावरच्या 'देवानं'ही वाचवलं नाही | रस्त्यावरच आयुष्य, रस्त्यावरच संपलं
सोलापूर (प्रशांत कटारे) डोक्यावर वेगवेगळे देवी-देवता घेऊन जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय आवारात फिरून त्या देवाचा दुसऱ्यांना आशीर्वाद देऊन पोटासाठी पैसे मागणाऱ्या तिघांचा आयुष्याचा दुर्दैवी अंत झाला. रस्त्यावरच आयुष्य रस्त्यावरच संपलं.
सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण तालुक्यातील मंदुप गावातील मरीआईवाले समाजातील अनेक कुटुंबातील महिला आपल्या लेकरा बाळांना घेऊन रोज सकाळी शनिवार रविवार वगळता नित्यनेमाने मिळेल त्या वाहनाने सोलापुरात येतात सायंकाळच्या साडेपाच नंतर हे सर्व कुटुंब एका ठिकाणी भेटून सात रस्ता परिसरातून पुन्हा मंदुपकडे रिक्षा जीपमधून रवाना होतात मात्र या कुटुंबाचा शुक्रवार 10 डिसेंबर हा दिवस काळा दिवस ठरला.
शुक्रवारी साडेपाचच्या सुमारास विजापूर ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर तेरामैल जवळील वळणावर देशमुख वस्ती आहे. सोलापूरकडे कार (एम.एच.१५ -जीएल १४२२) हे भरधाव वेगात निघाली होती. त्याच वेळी समोरून विरुद्ध दिशेने रिक्षा (एम.एच.१३-सीटी५६४९) आली. अचानक समोरून रिक्षावाल्याने कार चालकाचा गाडीवर ताबा सुटल्यामुळे दोन्ही वाहनांची जोराची धडक झाली. धडक इतकी जोरात होती की रिक्षा चपटली. कारचा समोरील भाग चक्काचूर झाला. यामुळे रिक्षात बसलेली महिला व मुले बाहेर फेकले गेले.काहीजण आतच अडकले होते. अपघात झाल्याचे समजतात तेरामैल परिसरातील सर्व जण धावून आले.मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ.नितीन थेटे हे घटनास्थळी दाखल झाले.
मंद्रुपचे गौरीशंकर मेंडगुदले, विश्वनाथ हिरेमठ, तेरामैलचे किसन पवार, आनंद देशमुख यांच्यासह अनेकांनी मदत केली. सर्वानी तातडीने जखमींना रिक्षा व खाजगी वाहनातून सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलविले. तर काहींना रुग्णवाहिकेतून पाठवले.या रिक्षामध्ये एकूण चालकासह पंधरा जण होते. सर्वजण गंभीर जखमी झाले.
या अपघातात सुजाता शंकर मरिआईवाले,तानु संजय मरिआईवाले,गीता विजय मरिआईवाले,नकुशा संजय मरिआईवाले, संगीता लखन मरिआईवाले,जयश्री संजय मरिआईवाले, रेश्मा भारत मरिआईवाले,लहान मुलांमध्ये आरती पोपट मरिआईवाले,अंकिता भगवान मरिआईवाले,आयुशा संजय मरिआईवाले, दीपक भगवान मरिआईवाले, नितीन शंकर मरिआईवाले, संस्कार मरिआईवाले यांचा समावेश आहे. तसेच रिक्षाचालक अंकुश राठोड सर्वजण राहणार मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर). या अपघातातील मृतांची संख्या तीन झाली आहे.
तानु संजय मरिआईवाले या महिलेचा शनिवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर
डोक्यास गंभीर दुखापत झालेल्या जयश्री संजय मरिआईवाले या अठरा वर्षाच्या मुलीने शनिवारी सायंकाळी पाच वाजता अखेरचा श्वास घेतला.
शनिवारी अर्चना दशरथ मरिआईवाले (वय २३) या महिलेचा मृत्यू झाला होता. एक लहान बालक वगळता सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
मरीआईवाले समाजामध्ये अंधश्रद्धा व निरक्षरता मोठ्या प्रमाणात आहे. मुलांना शिक्षणाऐवजी त्याला लहानपणापासून रस्त्यावर पैसे मागण्यासाठी फिरवले जाते. ही परिस्थिती अजूनही बदलली नाही हे या अपघातावरून दिसून येते हे दुर्दैव म्हणावे लागेल.

0 Comments