google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मैत्रिणी अधिकारी होऊ शकतात तर आपण का नाही ? अखेर झेप यशस्वी ठरलीच पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठारच्या सोनाली धनाप्पा मेटकरी यांची ही प्रेरणादायी यशोगाथा .

Breaking News

मैत्रिणी अधिकारी होऊ शकतात तर आपण का नाही ? अखेर झेप यशस्वी ठरलीच पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठारच्या सोनाली धनाप्पा मेटकरी यांची ही प्रेरणादायी यशोगाथा .

 मैत्रिणी अधिकारी होऊ शकतात तर आपण का नाही ? अखेर झेप यशस्वी ठरलीच पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठारच्या सोनाली धनाप्पा मेटकरी यांची ही प्रेरणादायी यशोगाथा .


सोलापूर : 'एलआयसी'मध्ये कार्यरत असताना सोबतच्या मैत्रिणी अधिकारी झाल्याने आपणही अधिकारी होऊ शकतो, या सकारात्मक विचाराने प्रेरीत होऊन स्पर्धा परीक्षेकडे आकर्षित झालेल्या...

नंतर पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर देखील 'तू एक ना एक दिवस अधिकारी होणारच' हा वडिलांचा असलेला विश्वास... यामुळे जिद्द व चिकाटीच्या जोरावर राज्यसेवेतून तहसीलदारपदी  निवड झालेल्या पंढरपूर  तालुक्‍यातील ईश्वर वठारच्या सोनाली धनाप्पा मेटकरी...  त्यांची ही प्रेरणादायी यशोगाथा 


आईवडील दोघेही उच्चशिक्षित. आई गृहिणी तर वडील राजकीय क्षेत्रात कार्यरत असायचे. कुटुंबाचा उदरनिर्वाह व सोनाली यांच्यासह भावंडांचे शिक्षण शेतीवर अवलंबून होते. शेती ही बेभरवशाची असल्याने, घरची आर्थिक परिस्थिती हलाखीचीच होती. गावातील जिल्हा परिषद  सोनाली यांचे शाळेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाले. शिक्षणाच्या बाबतीत कुटुंबातील सर्वजण परीक्षेत अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण होत. 


तोच वारसा सोनाली यांनीही पुढे सुरू ठेवला. दहावीत 17 पटसंख्या असलेल्या वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. नंतर पुढील शिक्षणासाठी पंढरपूरच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात करिअर करण्याची आई- वडिलांची मुभा होती. मुलगी आहे म्हणून कधीही त्यांनी कोणत्याही प्रकारची अडवणूक केली नाही.



सोनाली मेटकरी यांनी जवळपास पाच वर्षे शासकीय वसतिगृहात राहून शिक्षण घेतले. बारावीनंतर पंढरपुरातच बीएस्सीचे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयातील प्रत्येक स्पर्धा परीक्षेत, क्रीडा स्पर्धेत सहभाग आवर्जून असायचा. वडिलांचा स्पष्टवक्तेपणा, कणखर भूमिका, वक्तृत्व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप सोनाली यांच्यावर असल्याने वसतिगृहातील असो की महाविद्यालयातील मित्र-मैत्रिणींच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांचा पुढाकार असायचा. इथेच व्यक्तिमत्त्व विकासाची  चांगली जडणघडण झाली.



एकेदिवशी महाविद्यालयातून घरी जात असताना, पंढरपूरच्या चौकात तहसीलदारांची उभी असलेली गाडी व तेथील तहसीलदारांचा रुबाब, काम करण्याची पद्धत सोनाली यांच्या मनाला भावली. त्यामुळे आपणही आयुष्यात असेच काहीतरी व्हायचं असा एक आत्मविश्वास निर्माण झाला होता. पण सध्या तरी बीएस्सीनंतर एमएस्सी. करायचे इतकेच त्यांना माहीत होतं. 


त्यामुळे कोल्हापुरातून तेही शिक्षण पूर्ण केले. नंतर स्पर्धा परीक्षेचा घरूनच अभ्यास सुरू केला. जवळपास दोन ते तीन वर्ष घरीच होत्या. शिक्षण तर झाले परंतु हातात नोकरी नसल्याने निराश होत्या. अशात बीएस्सीचा एक मित्र 'एलआयसी'मध्ये नोकरीला लागल्याने, त्या कामाबाबत कसलीही माहिती नसताना सोनाली यांनीही ती परीक्षा देऊन 'एलआयसी'मध्ये सातारा येथे 'विकास अधिकारी' म्हणून प्रशिक्षणासाठी हजर झाल्या. मार्केटिंग क्षेत्रात काम असल्याने निराशच होत्या.


अशावेळी सोबत असणाऱ्या औरंगाबादच्या  मैत्रिणी रोहिणी थोटे व जयश्री काटकर यांची 'एमपीएससी'तून पोलिस उपनिरीक्षक व मुख्याधिकारी म्हणून निवड झाली. त्यांची निवड हीच खऱ्या अर्थाने सोनाली यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट  आहे. त्या होऊ शकतात तर आपण का नाही, आपणही स्पर्धा परीक्षा करायची, असा निश्‍चय पक्का करून प्रशिक्षण काळातच त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन थेट पुणे  गाठले. याची किंचितही कल्पना गावात व नातेवाइकांना कळू दिली नाही. त्यामागचे कारण होते की, लग्न करायच्या वयात असताना, हातात आलेल्या नोकरीचा राजीनामा देऊन स्पर्धा परीक्षा करतेय म्हटल्यावर कुणासाठीही हसूच झाले असते.



अपार कष्ट, मेहनत घेत राज्यसेवेची पहिली परीक्षा दिली. परंतु अपयशास सामोरे जावे लागले. या काळात मात्र वडिलांनी पाठिंबा दिला. 'कितीही अपयश येऊ दे, तू यशस्वी होणारच' असा एक आत्मविश्वास मनात निर्माण करून दिला. त्यांची प्रेरणा घेऊन पुन्हा त्याच जिद्दीने प्रयत्न केला अन्‌ एकाचवर्षी प्रथम विक्रीकर निरीक्षक व नंतर राज्यसेवेतून तहसीलदार म्हणून त्यांची निवड झाली. या निवडीनंतर आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. सध्या सोलापूर येथे लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अधिकारी म्हणून म्हणून त्या कार्यरत आहेत.

Post a Comment

0 Comments