सोलापूर | धवलसिंह मोहिते पाटील मुलाखतीतून निवडणार तालुकाध्यक्ष
सोलापूर : जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष झाल्यानंतर धवलसिंह मोहिते पाटील यांनी सुरुवातीला सर्व तालुक्यांचा आढावा बैठका घेतल्या, एवढ्यावर न थांबता त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघ निहाय कार्यकर्ता मेळावा घेतला. त्यानंतर जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील हे आपली जिल्ह्याची कार्यकारिणी कधी जाहीर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
विद्यमान तालुका अध्यक्ष यांचं काय होणार याचीही चर्चा असून जिल्हाध्यक्ष धवलसिंह यांनी थेट मुलाखत घेऊन सर्व निवडी करण्याचे नियोजन केले होते त्यानुसार गुरुवारी दुपारी बारा वाजल्यापासून काँग्रेस भवनामध्ये मुलाखतीचा कार्यक्रम सुरू होता.
जिल्हा कार्यकारी अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा सचिव, जिल्हा खजिनदार, विविध सेलचे अध्यक्ष अशा जिल्ह्यातून विविध पदांसाठी सुमारे 80 अर्ज कार्यकर्त्यांनी केले होते त्यामुळे रात्री उशिरापर्यंत या मुलाखती सुरू होत्या. मुलाखती पूर्वी जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांच्याशी चर्चा केली असता आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच आपण जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर करणार आहोत.
ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्याशी चर्चा करूनच ही यादी फायनल होईल. पक्ष संघटन वाढवणारा, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकित रिझल्ट देणारा, आणि पक्षात नव्याने माणसे जोडणाऱ्या कार्यकर्त्याला मी पद देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

0 Comments