सोलापूर ' आरटीओ ' कार्यालय आता स्वतंत्र होणार ; काय होईल सोलापूरला फायदा , वाचा सविस्तर
पुणे आरटीओ देखरेखीखाली असलेले सोलापूर आरटीओ (RTO) कार्यालय आता स्वतंत्र होणार आहे. डेप्युटी आरटीओ ऐवजी आता मुख्य आरटीओची पोस्ट सोलापूरला देण्याचा प्रस्ताव असल्याचे परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी सांगितले.सोलापूर जिल्ह्यासाठी सोलापूर व अकलूज ही दोन डेप्युटी आरटीओची कार्यालये आहेत. सोलापूरसाठी सोलापूर शहर , दक्षिण , उत्तर , मोहोळ , अक्कलकोट , बार्शी , पंढरपूर , मंगळवेढा तालुक्याचे कार्यक्षेत्र आहे.तर अकलूजसाठी माळशिरस, करमाळा, माढा, सांगोला या तालुक्याचे कार्यक्षेत्र आहे.
ही दोन्ही कार्यालये पुणे आरटीओ कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येतात. पण, आता सोलापूर आरटीओ कार्यालय स्वतंत्र होणार असून अकलूज हे सोलापूरच्या कार्यकक्षेत येणार आहे.राज्यात १५ प्रादेशिक , तर उप्रादेशिक कार्यालये आहेत. यातील ९ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांचा दर्जा उंचावून तेथे नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.त्यासाठी नवीन १२ आरटीओची पदे निर्माण करण्यात येणार आहेत. आयुक्त कार्यालयासह कार्यालयासाठी १६ आरटीओची पदे मंजूर आहेत.ही पदे २८ वर नेण्याच्या आकृतिबंधाला परिवहन खात्याच्या उच्चस्तरीय समितीची मंजुरी मिळाली असल्याचे आयुक्त ढाकणे यांनी सांगितले.
काय होईल सोलापूरला फायदा
सोलापूर कार्यालय पुणे आरटीओच्या अखत्यारीत येते. त्यामुळे अधिकाऱ्यांना बैठकांसाठी पुण्याला जावे लागते. चेकपोस्टवर पुण्यावरून ड्युट्या लागतात मल्टीअॅक्सल वाहनांची नोंदणी व परवान्यासाठी पुण्याचे हेलपाटे वाचणार आहेत. वाहनांच्या खटल्यांचा सोलापुरातच निपटारा होईल. अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्याने कामाचा वेग वाढेल.

0 Comments