कोरोनावरील प्रतिबंधित लसीतून विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे.
सोलापूर : कोरोनावरील प्रतिबंधित लसीतून विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे.सोलापूर शहरातील दोन लाख 64 हजार 781 तर ग्रामीणमधील आठ लाख 90 हजार 146 व्यक्तींनी अजून लसीचा एकही डोस घेतलेला नाही. या पार्श्वभूमीवर आता 'हर घर दस्तक' उपक्रमाअंतर्गत संबंधितांना घरोघरी लस टोचली जाणार आहे. महापालिका व जिल्हा आरोग्य विभागाने हा उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे.
जिल्ह्यातील 18 वर्षांवरील सर्वांनाच कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचली जात आहे. कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा तर कोविशिल्ड लस टोचल्यानंतर दुसरा डोस 84 दिवसांनी घेणे आवश्यक आहे. लसीकरणाचे चार टप्पे करण्यात आले असून त्यात पहिल्यांदा आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स, 18 ते 44 आणि 45 वर्षांवरील असे टप्पे आहेत. चिंतेची बाब म्हणजे, 18 ते 44 वयोगटातील सर्वाधिक तरुण अद्याप लसीकरणापासून दूर असून ते वास्तव 'सकाळ'च्या माध्यमातून 'पुनर्जन्माचे दोन डोस'ने समोर आणले होते. त्यानंतर घरोघरी लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता शहरातील नागरी आरोग्य केंद्रनिहाय व्यक्तींची यादी तयार करून त्यांना लस टोचली जाणार आहे. तर ग्रामीणमधील उत्तर सोलापूर, मोहोळ, मंगळवेढा, सांगोला, करमाळा, माळशिरस, बार्शी व पंढरपूर तालुक्यातील वाड्या- वस्त्यांवरही लसीकरण केले जाणार आहे. पहिला डोस 100 टक्के व्यक्तींनी घेतल्यानंतर दुसरा डोस न टोचलेल्यांचेही अशा प्रकारेच लसीकरण करण्याचे नियोजन आहे.
तालुकानिहाय लसीकरणाची स्थिती...
तालुका : एकही डोस न घेतलेले
उत्तर सोलापूर : 26,873
दक्षिण सोलापूर : 52,258
मोहोळ : 84,782
मंगळवेढा : 77,396
सांगोला : 1,02,812
माढा : 81,527
अक्कलकोट : 53,063
करमाळा : 72,171
माळशिरस : 1,36,585
बार्शी : 80,038
पंढरपूर : 1,22,641
जिल्ह्याला 39 लाख डोसची गरज
जिल्ह्यातील 11 लाख 54 हजार 927 व्यक्तींनी अजूनपर्यंत लसीचा एकही डोस घेतलेला नाही. तर दुसरीकडे 15 लाख 61 हजार 739 व्यक्तींनी दुसरा डोस घ्यायचा आहे. त्यासाठी जिल्ह्याला आणखी 38 लाख 71 हजार 593 डोस लागणार आहेत. सध्या जिल्ह्यासाठी दोन लाख डोस शिल्लक असून एकही डोस न घेतलेल्यांना प्राधान्याने लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी 'हर घर दस्तक' हा उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती लसीकरणाचे जिल्हा समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी दिली.
0 Comments