सोलापूर : ऑनलाइन बांधकाम परवान्याला ' खो '
सोलापूर : महापालिकेतील कारभारात पारदर्शकता यावी, नागरिकांची सोय व्हावी, या मुख्य उद्देशाने आयुक्तांनी बांधकाम परवाना ऑनलाइनद्वारे देण्याकरिता १ नोव्हेंबरपासून बीपीएमसी ही पध्दत अंमलात आणली.परंतु सर्व्हरमध्ये त्रुटी असल्याने ऑनलाइन बांधकाम परवान्याला तांत्रिक अडचण निर्माण होत असल्याचे सांगत २०० पैकी एकाही अभियंत्याने गेल्या आठ दिवसात ऑनलाइनद्वारे एकही प्रस्ताव दाखल केला नाही. त्यामुळे आयुक्तांच्या ऑनलाइन बांधकाम परवानगीला अभियंत्यांकडून 'खो' बसला आहे.
सोलापूर शहरात महापालिकेचा परवाना असलेल्या अभियंत्यांची संख्या ही साधारण ८०० इतकी आहे. यातील २०० परवानाधारक हे महापालिकेत बांधकाम परवानगी प्रस्ताव दाखल करण्याचे काम करतात. सध्या गुंठेवारी बांधकाम परवानगी बंद आहेत. तर प्राथमिक रेखांकनाला मोजणी नकाशावरून परवानगी दिली जात आहे, पण ती आफलाइनच असणार आहे. सध्या अंतिम रेखांकन मंजूर प्लॉटची बांधकाम परवानगी ही ऑनलाइन पध्दतीने देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासाठी महापालिकेतील अधिकाऱ्यांसह अभियंत्यांना दोन दिवसाचे ऑनलाइन पध्दतीचे प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षणा दरम्यान ऑनलाइन पध्दतीमध्ये अनेक त्रुटी असल्याचे सांगत ७० टक्के अभियंत्यांनी याबाबत निगेटिव्ह अहवाल आयुक्तांना दिला. मात्र आयुक्त हे महापालिकेतील कारभार हा पारदर्शी असावा, नागरिकांना वेळेत आणि कमी त्रासामध्ये परवानगी मिळण्यासाठी ऑनलाइन पध्दतीने कामकाज करण्यावर यावर ठाम राहिले. १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन कामकाजाला प्रारंभ करण्याचे आदेश आयुक्तांनी नगररचना विभागाला दिले. मात्र गेल्या आठ दिवसात बीपीएमसी पध्दतीने एकही प्रकरण महापालिकेकडे बांधकाम परवानगीसाठी सादर करण्यात आले नाही. परवानगी ऑनलाइन की ऑफलाइन या संभ्रमात महापालिका कर्मचारी अंतिम लेआऊटची प्रकरणेदेखील दाखल करून घेत नसल्याचे दिसून येते.
ऑनलाइन पध्दत नागरिकांच्या सोयीची
प्रस्ताव सादरीकरणापासून ते ३० दिवसाच्या आत बांधकाम परवानगी मिळणे ही नियमानुसार बंधनकारक राहणार एखादे प्रकरण कोणाकडे, किती दिवस प्रलंबित आहे याची इतंभूत माहिती मिळणार कागदपत्रांची त्रुटी असल्यास ऑनलाइन प्रस्ताव दाखल होणार नाही. त्यामुळे कमी कागदपत्रांमध्ये परवानगी काढून देण्यासाठी होणारे आर्थिक साटेलोटं थांबणार. कागदपत्रांची छाननी, प्रस्ताव दाखल, स्कूटणी, संबंधित अभियंत्याची सही, परवाना इश्यू आदी प्रक्रियेतून बांधकाम परवानगी प्रस्ताव जात असताना असलेले टोलनाके पूर्णत: बंद होणार संबंधित मिळकतधाराला परवानगी प्रस्तावाचे अपडेट मेसेजद्वारे मिळणार आणि महापालिकेत होणारे हेलपाटे कमी होणार
0 Comments