सांगोल्यात उभारणार शासकीय ट्रामा केअर युनिट
सांगोला/प्रतिनिधी ;-सांगोला शहर व तालुक्यातील दळणवळणात दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे. सांगोले नगरामधून तसेच तालुक्यामधून तीन वेगवेगळे राष्ट्रीय महामार्ग गेलेले आहेत. रत्नागिरी-- नागपूर रा.मा. क्र. 166, इंदापूर-- जत रा. मा क्र. 965 जी व सांगोले-- पंढरपूर-- परांडा रा.मा क्र.965 सी असे नवीन महामार्ग निर्माण झाले आहेत. ते सिमेंट काँक्रीटचे असून पुढील पन्नास वर्षाचा विचार करून बनविण्यात आलेले आहेत. या महामार्गामुळे वाहनांची गती वाढली आहे. त्यामुळे रस्त्यावरील अपघाताचे ही प्रमाण वाढले आहे.सांगोले तालुक्यात इतरही काही राज्य मार्ग आहेत.
मिरज ते सोलापूर हे अंतर जवळजवळ 181 कि.मी. असून या महामार्गावर जर अपघात झाला तर उपचारासाठी सक्षम अशी कोणतीच शासकीय वैद्यकीय यंत्रणा जवळपास नाही. रुग्णास एकतर मिरजेला हलवावे लागते किंवा पंढरपूर, सोलापूर येथे हलवावे लागते. रुग्ण वेळेत न पोहोचल्याने उपचाराअभावी अनेकदा तो दगावण्याची शक्यता जास्त असते. म्हणून महाराष्ट्र शासनाच्या दि. 17.01. 2013 च्या शासन निर्णयान्वये सांगोले येथे शासकीय ट्रामा केअर युनिटच्या मुख्य इमारतीच्या बांधकामास मंजुरी देण्यात आली. ट्रामा केअरच्या बांधकामासाठीच्या 4.35 कोटी रुपये इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास दि.12.06.2015 रोजी राज्य शासनाकडून तरतूद करण्यात आली होती परंतु दर सूचीतील बदल व ट्रामा केअर युनिटची इमारत हरित इमारत(Green Building) या संकल्पनेनुसार आधारित बांधावयाची असल्याने सुधारित दर सूचीने सन 2018-2019 च्या महाराष्ट्र शासनाच्या अंदाजपत्रकात 10.47 कोटी रुपयेच्या सुधारित अंदाजपत्रकास व आराखड्यास दि.21.06.2019च्या शासन निर्णयान्वये मान्यता प्रदान करण्यात आली आहे.दूरदृष्टीने विचार करून स्व.भाई गणपतराव देशमुख यांनी या युनिटबाबत आग्रह धरून मंजूर करून घेतले.सोलापूर जिल्ह्यातील सांगोले येथे अशाप्रकारचे बहुदा हे पहिलेच युनिट असावे. सदर मुख्य इमारतीचे बांधकाम गायत्री कंट्रक्शन, विटाचे मनोज पाटील यांना सदर कामाचा ठेका दिला गेला.
बांधकामाची निविदा ही गायत्री कंट्रक्शन कंपनीने आराखडा मंजूर दरापेक्षा 8.91% इतक्या कमी दराने भरून बांधकामाचा ठेका घेतला. युनिटचे बांधकाम हे हरित इमारत बांधकाम याप्रकारचे असून तळमजला हा 12650 चौ.फूट व पहिला मजला 5470 चौ.फूट असे एकूण 18120 चौ.फुटाची इमारत असून सांगोल्यातील गोरगरीब रुग्णांची उपचाराची सोय आता स्थानिक पातळीवरच होणार आहे. सदर इमारतीचे बांधकामा बरोबरच त्यासाठी लागणारा स्टाफ, डॉक्टर्स ,नर्स, सेवक, वाहने व त्यांचे चालक याबाबतची मंजुरीही आमदार असताना व नसतानाही स्व.भाई गणपतराव देशमुख यांनी मागील युती शासनाच्या काळात तत्कालीन वित्त व नियोजन मंत्री, सुधीरजी मुनगंटीवार यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून या कामाची मंजुरी मिळविली त्यामुळेच सदर युनिट सांगोले येथे मंजूर झाले.या बांधकामावर शासकीय निरीक्षण श्री.ए.एन. मुलगीर, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, सांगोला हे करत आहेत तर कंपनीचे व्यवस्थापक प्रकाश भोसले हे इतर कामकाज पहात आहेत. स्व.भाई गणपतराव देशमुख यांच्यामुळे सोलापूर जिल्ह्यात हे पहिलेच ट्रामा केअर सेंटर. गोरगरीब रूग्णांना मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही. रूग्णांस त्वरित उपचार मिळणार. रूग्णांच्या एकुण खर्चात बचत होणार.
रूग्णांना उपचारासाठी दूर जावे लागणार नाही. स्व.आबासाहेबांच्या धोरणामुळे गोरगरिबांची सांगोला येथेच सोय होईल.
-डॉ.बाबासाहेब देशमुख (स्व.गणपतराव देशमुख यांचे नातू)
शासकीय ट्रामा केअर युनिटच्या बांधकामास सर्वतोपरी सहकार्य करणार. विद्यमान आमदार म्हणून अत्याधुनिक यंत्रसामुग्री मिळविण्यासाठी प्रयत्न करून अडचणी आल्यास सोडविणार.
अॅड.शहाजीबापू पाटील, आमदार सांगोले.
0 Comments