पालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने विधान परिषदेच्या आमदारांना फटका
विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागा रिक्त असतानाच, करोनामुळे लांबणीवर पडलेल्या महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका, बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे निवडणुकांना होणारा विलंब यामुळे लवकरच मुदत संपणाऱ्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व आठ मतदारसंघांतील निवडणुका मुदतीत होण्याबाबत साशंकता आहे.कारण मतदार असलेल्या नगरसेवकांची मुदत संपल्यास या निवडणुका लांबणीवर पडू शकतात.
विधान परिषदेच्या मुंबईतील दोन, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, नगर, बुलढाणा व अकोला, धुळे या आठ मतदारसंघांतील आमदारांची मुदत डिसेंबरअखेर संपत आहे. या मतदारसंघांमध्ये नोव्हेंबरअखेर किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला निवडणूक होण्याची शक्यता आहे. करोनामुळे कोल्हापूरसह पाच महानगरपालिकांच्या निवडणुका गेले वर्षभर होऊ शकलेल्या नाहीत. तसेच राज्यातील जवळपास १०० नगरपालिकांची मुदत गेल्या वर्षी संपली होती. तेथेही निवडणूक झालेल्या नाहीत. ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांत सुमारे १५०च्या आसपास नगरपालिकांची मुदत संपुष्टात येत आहे. बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू झाल्याने पुढील दोन महिन्यांत सर्व निवडणुका होण्याची शक्यता कमीच आहे. कारण नव्याने प्रभाग रचना करण्यास विलंब लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायतीचे सदस्य हे मतदार असतात. नगरसेवकांची मुदतच संपल्यास ते मतदार नसतील. नव्याने निवडणुका झाल्यावर निवडून आलेले सदस्य हे विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदार होतील. निवडणूक आयोगाने रिक्त होणाऱ्या आठ मतदारसंघांतील निवडणुका घेण्याबाबत प्राथमिक तयारी सुरू केली आहे.
. तरच निवडणूक
निवडणूक कायद्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूण मतदारांपैकी ७५ टक्के मतदार हे मतदानास पात्र असले तरच निवडणूक घेतली जाऊ शकते. यामुळे या आठ मतदारसंघांमध्ये किती मतदार हे पात्र आहेत याची माहिती जमा करण्याचे काम सुरू झाले आहे. ही सारी माहिती जमा झाल्यावर ती नवी दिल्लीत निवडणूक आयोगाकडे पाठविली जाईल. त्यानंतरच रिक्त होणाऱ्या आठपैकी किती मतदारसंघांमध्ये निवडणूक घ्यायची याचा निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे सहनिवडणूक अधिकारी अनिल वळवी यांनी सांगितले. मुंबईतील दोन जागा रिक्त होत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या विद्यमान सदस्यांची मुदत ही मार्चपर्यंत असल्याने डिसेंबरमध्ये या दोन जागांसाठी निवडणूक घेण्यात अडचण येणार नाही. अन्य सहा मतदारसंघांत मात्र ७५ टक्के मतदार पात्र असल्याचे स्पष्ट झाले तरच निवडणूक होऊ शकते. कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील निवडणूक लांबणीवर पडल्यास गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांना त्याचा फटका बसू शकतो.
निवृत्त होणारे सदस्य
रामदास कदम (शिवसेना) मुंबई
भाई जगताप (काँग्रेस) मुंबई
गिरीश व्यास (भाजप) नागपूर
राज्यमंत्री सतेज पाटील (काँग्रेस) कोल्हापूर
प्रशांत परिचारक (अपक्ष भाजपप्रणीत) सोलापूर
अमरिश पटेल (भाजप) धुळे नंदुरबार
गोपीकिसन बजोरिया (शिवसेना) अकोला, बुलढाणा
अरुण जगताप (राष्ट्रवादी) नगर
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण मतदारांच्या ७५ टक्के मतदार पात्र असतील तरच निवडणूक घेण्याची कायद्यात तरतूद आहे.
- अनिल वळवी , सहनिवडणूक अधिकारी , महाराष्ट्र
0 Comments