google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कोरोना रुग्णाची उपचारादरम्यान आर्थिक लूट; मंगळवेढ्यातील नातेवाईकांच्या तक्रारीनंतर हॉस्पिटलवर गुन्हा

Breaking News

कोरोना रुग्णाची उपचारादरम्यान आर्थिक लूट; मंगळवेढ्यातील नातेवाईकांच्या तक्रारीनंतर हॉस्पिटलवर गुन्हा

 कोरोना रुग्णाची उपचारादरम्यान आर्थिक लूट; मंगळवेढ्यातील नातेवाईकांच्या तक्रारीनंतर हॉस्पिटलवर गुन्हा


कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेचा फटका तालुक्यातील अनेक रुग्णांना बसला असतानाच मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर येथील रुग्णावर मिरज येथील अँपेक्स हॉस्पिटलमध्ये उपचार करताना दुर्लक्ष करत २४ तासात एक लाख ४० हजार इतके बिल आकारल्याची तक्रार मृताच्या नातेवाइकांनी मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात दाखल केली.

या प्रकरणात तालुक्यातील अनेक रुग्णाच्या नातेवाईकांना याच रूग्णालयात उपचार करताना आर्थिक फटका दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

गुरुदेव महादेव कोरे (रा.हुनुर ता.मंगळवेढा) यांनी वडील महादेव आमगोंडा कोरे यांना कोरोनासदृश्य आजाराची लक्षणे दिसल्यानंतर सांगोला येथे उपचारासाठी दाखल केले होते.


परंतु, त्यांना अधिक त्रास झाल्यामुळे पुढील उपचारासाठी मिरज येथील अँपेक्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोरे यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून २४ तासात कोणते उपचार केले, याची माहिती व्यवस्थापनाने नातेवाईकांना दिली नाहीत आणि उलट त्याच्या वडिलाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले.

त्यानंतर नातेवाईकांना प्रकृतीबाबतही कोणती माहिती दिली नाही. कोरे यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून २४ तासात त्यांचा मृत्यू झाला. उपचारादरम्यान भरलेल्या बिलाची पावती मागितली असता तुम्हाला पावती हवी की रुग्णावर उपचार, असा सवाल येथील डॉक्टरांकडून उपस्थित केला होता.

मात्र रुग्णाचा मृत्यू झाला. या २४ तासाचे रुग्णालयाने बिल मात्र १ लाख ४० हजार रुपये भरून घेतले. परंतु , उपचारादरम्यान कोणते उपचार केले व बिलाच्या पावत्या देण्यास टाळाटाळ करत त्यांची फसवणूक करण्यात आली.


या रुग्णालयात कोरोना काळात रुग्णावर उपचारादरम्यान हायगय केल्याच्या आरोपावरून डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर पोलिसात गुन्हा दाखल आहे


मंगळवेढ्यातील अनेक रुग्णांची लूट

कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेत मंगळवेढ्यातील अनेक रुग्णांना कोरोना उपचारासाठी बेड उपलब्ध नसल्यामुळे शहरात,सांगली जिल्ह्यातील मिरज, सांगली , जयसिंगपूर , इस्लामपूर या तालुक्यातील रुग्णालयाचा आधार घेतला.


परंतु येथील अनेक डॉक्टरांनी तालुक्यातील रुग्णांच्या नातेवाइकांकडून हात साफ करून घेतले. हुन्नुरच्या बरोबर भाळवणी, नंदेश्वर, हिवरगाव, खुपसंगी भोसे येथील रुग्णांची देखील आर्थिक लूट केली असल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.

Post a Comment

0 Comments