वाळू माफियासह अवैध वाळू खरेदी करणाऱ्या बांधकाम मालकावरही कारवाई होणार : वाळू चोरी रोखण्यासाठी तहसीलदार अभिजीत पाटील यांनी घेतला धाडसी निर्णय
सांगोला / प्रतिनिधी : वाळू चोरी करणाऱ्या वाळू माफिया बरोबरच आता सांगोला शहर व तालुक्यात ज्या- ज्या ठिकाणी इमारतीची बांधकामे सुरू आहेत . अशा ठिकाणी विनापरवाना व अवैधरित्या वाळू साठा आढळून आल्यास , आता थेट इमारतीच्या मालकावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा तहसीलदार अभिजित पाटील यांनी दिला आहे .त्यामुळे सांगोला शहरासह तालुक्यातील इमारत बांधकाम करणा-या मालकांचे धाबे दणाणले आहेत. वाळू चोरी रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने आता वाळू चोरट्यांसोबत चोरीची वाळू खरेदी करणारावर कारवाईचा बडगा उगारला आहे . सदर कारवाई ची सुरुवात गुरुवार दिनांक ८ जुलै रोजी पासून सुरू करण्यात आली आहे . यामध्ये वाळू चोरी करणाऱ्या दोघा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .तर तीन इमारतीच्या बांधकामा ठिकाणी मिळून आलेल्या वाळूचा पंचनामा करण्यात आला आहे . सदर वाळूची शासन नियमानुसार रीतसर पावती असेल तर सदरची कारवाई टळणार आहे. अन्यथा इमारतीच्या बांधकाम मालकावर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे महसूल विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे . तालुक्यात अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी सांगोला महसूल प्रशासन प्रयत्नशील असून , विनापरवाना अवैध वाळू उपसा करताना नदीपात्रात आढळून आल्यास वाहनांवर व वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जात आहे . यासह आता वाळू चोरीला आळा बसण्यासाठी वाळू माफियांसह वाळू खरेदी करणाऱ्या इमारतीच्या मालकांवर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा तहसीलदार अभिजीत पाटील यांनी दिला आहे .


0 Comments