“सध्या डेल्टा प्लसच्या संदर्भात अधिक चिंता करण्याची आवश्यकता नाही” ; आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : देशात कोरोना पाठोपाठ आज डेल्टा प्लस या नवीन आजाराने देखील डोकेवर काढले आहे. या संदर्भात सर्वसामान्यांमध्ये अनेक संभ्रम निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण देखील दिसत आहे. मात्र आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भात माध्यमांशी बोलताना माहिती दिली. या क्षणाला डेल्टा प्लसच्या संदर्भात अधिक चिंता करण्याची आवश्यकता नसून आपण सध्या कोरोना नियमांचे पालन करून वागावे, एवढीच माझी सूचना राहील, असे टोपे म्हणाले आहे.आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले की, डेल्टा प्लसच्या संदर्भात दर महिन्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण साधारण १०० नमूने घेतो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये दर आठवड्याला २५ नमूने घेतो आणि अशा पद्धतीने प्रती महिना आपण डेल्टा प्लसच्या सॅम्पलचे होल जीनोम सिक्वेन्सिंग करतो. हे होल जीनोम सिक्वेन्सिंग आजपर्यंत जे ४ हजार लोकांचे झाले, त्यामध्ये २१ लोक डेल्टा प्लस पॉझिटव्ह आढळले. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला, पण बाकीचे सर्वजण बरे होऊ घरी परतले आहेत. त्यामुळे एकदम चिंता करण्यासारखी परिस्थिती नाही.तसेच, दररोजची आरटीपीसीआरची क्षमता ही खऱ्या अर्थाने, पावणेदोन लाख- दोन लाखापर्यंत आहे आणि त्या क्षमतेपर्यंत आपण आपल्या तपासण्या दररोज घेतल्याच पाहिजेत, असे देखील आम्ही आरोग्य विभागावला सूचित केले आहे. केवळ आरोग्य विभागच नाही तर वैद्यकीय शिक्षण, महापालिकेचा जो भाग असेल त्यांना देखील सूचिक केले आहे की, तपासण्या अजिबात कमी करता कामा नये. कारण, चाचण्या कमी केल्यामुळे देखील थोड्याफार प्रमाणात दररोजच्या पॉझिटिव्ह असलेल्यांच्या संख्येवर परिणाम होत असतो. लोकांनी चाचण्यांसाठी देखील सहभाग घ्यावा. तपासणी, लसीकरण याचे आवाहन नागरिकांना आहे आणि याचबरोबर कोरोना नियमांचे पालन करून वागणे हा सर्वसामान्य मंत्र आहे, त्याचे पालन करावे, असे आवाहन देखील आरोग्यमंत्री टोपेंनी नागरिकांना यावेळी केले.


0 Comments