छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन स्वराज्याची , सार्वभौमत्वाची आणि स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे . या दिनाचे महत्त्व आणखी दृढ होण्यासाठी ६ जून हा दिवस राज्यातील सर्व ग्रामपंचायती , पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .
यंदा कोरोना प्रतिबंधक विषयक नियमांचे पालन करून राज्यातील सर्व जिल्हा परिषदा , पंचायत समित्या व ग्रामपंचायतींमध्ये हा दिन साजरा करण्यात येणार आहे , अशी माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली . यासंदर्भात ग्रामविकास विभागाने १ जानेवारी २०२१ रोजीच्या परिपत्रकानुसार सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत . यानुसार शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येईल , असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले . जिल्हा मुख्यालय येथे पालकमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हा परिषद पदाधिकारी , अधिकारी यांच्या उपस्थितीत शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येईल . भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून अभिवादन करावे . राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करून कार्यक्रम संपन्न करण्यात यावा , अशा सूचना देण्यात आल्या आहेत .


0 Comments