google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कोव्हिड सेंटरसाठी सरपंच व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत,तलाठी कार्यालयाला ठोकले टाळे; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

Breaking News

कोव्हिड सेंटरसाठी सरपंच व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत,तलाठी कार्यालयाला ठोकले टाळे; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

 कोव्हिड सेंटरसाठी सरपंच व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत,तलाठी कार्यालयाला ठोकले टाळे; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार


गावात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असून, वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोहोळ तालुक्यातील खवणी येथे कोव्हिड सेंटर सुरू करण्यात यावे अशी मागणी करीत, कोरोना संसर्ग रोखण्याच्या शासनाच्या प्रक्रियेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून गावकामगार तलाठी व ग्रामसेवक गावात येत नसल्याबद्दल ग्रामपंचायत कार्यालय व तलाठी कार्यालयाला सरपंच व ग्रामस्थांनी टाळे ठोकून निषेध व्यक्त केला आहेया टाळे ठोको आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही सरपंच व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनामध्ये दिला आहे.जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, की तलाठी व ग्रामसेवक गावात येत नाहीत. नवीन ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांना ग्रामपंचायतीचे दप्तर, बॅंक खाते, प्रोसिडिंग पुस्तक, पाणीपुरवठा, वीज वितरण पद्धतीचे दप्तर अद्याप दाखविण्यात आले नाही, यासह विविध तक्रारी करण्यात आल्या आहेत.

या निवेदनावर सरपंच शीतल यमगर, उपसरपंच सिंदू बोबडे, ग्रामपंचायत सदस्य सतीश खिलारे, रेखा भोसले, सुरेखा भोसले, भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे संजीव खिलारे, सूर्यकांत भोसले, सचिन भोसले, महादेव यमगर, तेजस बोबडे, ज्योतिराम सचिन शिंदे आदींच्या सह्या आहेत.दरम्यान, झालेल्या आरोपांबाबत ग्रामसेवक मिलिंद तांबिले म्हणाले, बाभळगाव व खवणी या दोन गावांचा पदभार माझ्याकडे आहे. आठवड्यातून दोन दिवस मी खवणी येथील कार्यालयामध्ये उपस्थित असतो. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या गावपातळीवरील राजकारणामुळे कदाचित माझ्यावर हे आरोप केले जात असावेत.तर तलाठी मंगेश बनसोडे यांनी सांगितले की, माझ्याकडे खवणी व पोखरापूर या दोन गावांचा कार्यभार असून मुख्य कार्यालय पोखरापूर येथे आहे. आवश्‍यकता असेल तेव्हा प्रत्यक्ष त्या जागेवर जाऊन कार्यालयीन कामकाज करीत असतो.जिल्ह्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक गावे प्रयत्नशील आहेत. अनेक गावांमध्ये कोरोनाचा अटकाव होत आहे तर काही गावांमध्ये त्याचा प्रादुर्भाव वाढतच आहे.दरम्यान, खवणी गावात वाढत्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामस्थांना ग्रामपंचायतीला टाळे ठोकून आंदोलन करावे लागले. प्रशासनाने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

Post a Comment

0 Comments