रस्त्यावरच्या कोरोना रॅपिड टेस्ट मुळे मोकाटांच्या गर्दीला लागला लगाम, पंढरपूर पॅटर्नचा जिल्ह्यात डंका,इतरांनीही घेतला आदर्श
कोरोणा महामारी च्या पहिल्या लाटे पेक्षा दुसरी लाट पंढरपूर शहर व तालुक्याला चांगलीच घातक ठरली आहे. दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अनेक राजकीय नेते तालुका व शहराने गमावले, महत्त्वाच्या काही व्यक्तींना कोरोणाने आपल्या विळख्यात घेतले त्यामुळे ही लाट कदापिही न विसरता येण्यासारखी आहे. परंतु सध्या प्रशासनाच्या एकजुटीच्या कामामुळे दिसरी लाट सध्या ओसरत जात आहे.लाट थोपवून धरण्यासाठी प्रशासनाने अनेक उपाय योजना राबवल्या. त्यामध्ये रस्त्यावर रॅपिड टेस्ट (कोविड चाचणी ) हा अभिनव उपक्रम पंढरपूर मध्ये राबवला गेला. या उपक्रमामुळे रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या गर्दीला लगाम लागला तर शासकिय कार्यालयेही आपोआपच ओस पडली,याचा परिणाम म्हणून कोरोना रुग्ण संख्या कमी होण्यास मोठा हातभार लागला.त्यामुळे या "पंढरपूर पॅटर्नचा" इतर तालुक्यांनी आदर्श घेतला असून त्या त्या तालुक्यांनीही आता रस्त्यावर कोरोना चाचणी घेण्याचे काम सुरू केले आहे.पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोना बऱ्यापैकी आटोक्यात आला होता. मात्र पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक नंतर शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा विस्फोट झाला व मंगळवेढ्यातही मोठा थैमान घातला. रुग्ण संख्येने तीन आकडी संख्या पार केली.दररोज शेकडो रुग्ण पॉझिटिव सापडू लागले. त्यामुळे प्रशासनाने कडक उपाययोजना सुरू केल्या, याचाच एक भाग म्हणून रस्त्यावर मोकाट येणाऱ्या गर्दीला आवर घालण्यासाठी प्रशासनाने रस्त्यावरच रॅपिड टेस्ट करण्याचे काम सुरू केले
प्रांताधिकारी सचिन ढोले,उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तहसीलदार सुशील बेल्हेकर,गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व आरोग्य विभागाच्या वतीने दि. 5 मे पासून एक पथक रस्त्यावर उतरले आहे.या पथकामध्ये डॉ. प्रकाश बिराजदार, डॉ. संजय मोरे,पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक अरुण पवार यांचा समावेश आहे.या पथकाने शहरातील अर्बन बँक, छत्रपती शिवाजी चौक, बाजारपेठ, बोहरी पेट्रोल, जनकल्याण हॉस्पिटल, सरगम चौक,टिळक स्मारक मंदिर,उपजिल्हा रुग्णालय परिसर, स्टेशन रोड, संत पेठ,चौफाळा व शहरातील विविध गर्दीच्या ठिकाणांसह तहसील,पंचायत समिती या शासकीय कार्यालय जवळ रस्त्यावर फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी केली.आतापर्यंत जवळपास 500 जणांची चाचणी झाली असून यामध्ये 32 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. या सर्व पॉझिटिव्ह रुग्णांना पोलीस ॲम्बुलन्स द्वारे 65 एकर व गजानन महाराज मठ येथील कोरोना केअर सेंटर मध्ये पाठवण्यात आले. शहरांमधील 7 आरोपींची ही टेस्ट केली ते सर्व निगेटिव्ह आले आहेत. केवळ तीस मिनिटांमध्ये जागेवर हा रिपोर्ट उपलब्ध होतो, त्यामुळे ज्यांची टेस्ट झाली त्यांना जागेवरच थांबवून ठेवले जाते. या उपक्रमामुळे पंढरीत मोकटांची गर्दी कमी झाली, तर विनाकारण पॉझिटिव्ह असतानाही फिरून संसर्ग वाढवनाऱ्याना लगाम बसला. याचा सकारात्मक परिणाम दिवसेंदिवस वाढत जाणारी रुग्ण संख्या आटोक्यात आली,म्हणून यापुढेही ज्या ज्या ठिकाणी पोलिसांचे चेक पोस्ट आहेत त्या सर्व ठिकाणी केली जाणार आहे.
सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच पंढरपूर मध्ये हा अभिनव उपक्रम राबवला जात आहे.त्यामुळे या उपक्रमाची चर्चा जिल्ह्यात होत असून इतरही तालुक्यांनी या उपक्रमाचा आदर्श घेत आप-आपल्या तालुक्यात हा उपक्रम राबवण्यस सुरुवात केली आहे.त्यामुुळे वाढत जाणाऱ्या कोरोना रुग्ण संख्येवर "रस्त्यावरील कोरोना चाचणी" हा रामबाण उपाय ठरत असल्याचे पहावयास मिळत आहे.


0 Comments